'पासपोर्ट सेवा सामान्यांपर्यंत पोचवली'

'पासपोर्ट सेवा सामान्यांपर्यंत पोचवली'

पुणे - ‘‘पासपोर्ट हे प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देणारे माध्यम आहे, त्यामुळे परदेशांत नोकरी- व्यवसाय करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरते.  सर्वसामान्य नागरिकांनाही पासपोर्ट मिळाले, तर त्यांच्याकडून देशाच्या विकासाला हातभार लावला जाऊ शकतो. म्हणूनच पासपोर्ट सेवा सामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,’’ अशी भावना परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांनी सोमवारी व्यक्त केली.

पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारीपदावरून गोतसुर्वे यांना नुकतीच परराष्ट्र मंत्रालयामध्ये पदोन्नती मिळाली. त्यानिमित्त मैत्र युवा मंच, सम्यक उपासक संघ, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, बानाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यवसाय व रोजगाराभिमुख प्रबोधिनीतर्फे गोतसुर्वे यांचा महात्मा फुले पगडी, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी माजी अप्पर जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे, संजय ताकसांडे, प्रल्हाद हिरामणी, पांडुरंग शेलार, डॉ. बबन जोगदंड आदी उपस्थित होते. गोतसुर्वे यांच्या मातोश्री धोंडूबाई गोतसुर्वे यांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.

गोतसुर्वे म्हणाले, ‘‘गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी विचार मी कृतीत उतरविला. पासपोर्ट हा सामाजिक बदलातील महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी दिवसाला ९६० पासपोर्ट जात होते; मात्र माझ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरामुळे दिवसाला दोन हजार पासपोर्ट मिळत आहेत. एजंटगिरी, वशिला थांबवून ‘ऑनलाइन सेवा’ दिली. विशेषतः खेड्यांमधील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली.’’

देशभ्रतार म्हणाल्या, ‘‘गोतसुर्वे यांनी पासपोर्ट कार्यालयाचा चेहरामोहरा बदलला. पासपोर्ट मिळण्याची वेळेची मर्यादा कमी केली. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून एकसमानता आणली. त्यांच्यामुळेच ‘पासपोर्ट मॉडेल’ बनू शकले. त्यांनी अधिकारी आणि त्याच्या पदापेक्षा व्यवस्था मजबूत केली.’’

वानखेडे म्हणाले, ‘‘धम्माच्या मार्गावर चालणारे गोतसुर्वे यांनी केलेल्या पासपोर्ट व्यवस्थेतील आमूलाग्र बदलांची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना परराष्ट्र खात्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली. पुणे विभागात एक संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. ‘पासपोर्ट आपल्या दारी’ ही संकल्पना त्यांनी निर्माण केली, त्यामुळेच ते ‘पासपोर्ट मॅन’ ठरले.’’ सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले, तर आभार डॉ. किशोर पाटील यांनी मानले.

परराष्ट्र खात्याच्या सांस्कृतिक विभाग संचालकपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. देशातील उपेक्षित कलाकारांची कला जगभर पोचविणे आणि जगभरातील कला भारतीयांपर्यंत पोचविण्यास माझे प्राधान्य असेल.
- अतुल गोतसुर्वे, संचालक,  परराष्ट्र मंत्रालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com