ऐन पावसाळ्यात काँक्रिटीकरणाचा घाट!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पुणे - ऐन पावसाळ्यात गल्लीबोळातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन नगरसेवकांनी केले असून, त्याकरिता लाखो रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा ठराव स्थायी समितीसमोर मांडला आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होत असतानाही काँक्रिटीकरणाचा घाट का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. तसेच नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे ठराव आहेत.

रस्त्यांचे काँक्रिटीकरण, क्रीडांगणे, नव्या जलवाहिन्या, चौकाचौकांत पथदिवे, आरोग्य कोठ्यांची देखभाल-दुरुस्ती, प्रभागांमधील अशा कामांकरिता तब्बल सव्वापाच कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा ठराव रविवारी पुन्हा स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. या कामांसाठी नगरसेवकांनी सुचविलेल्या प्रकल्पांचा निधी वळविण्यात येईल, असे स्थायी समितीने स्पष्ट केले. त्यासंदर्भातील ठरावांवर मंगळवारच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पाला (२०१७-१८) मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसांमध्ये वर्गीकरणाचे ठराव मांडण्यात येत आहेत. परंतु मूळ अर्थसंकल्पातील निधीचे वर्गीकरण न करण्याची स्थायीची भूमिका आहे.

वर्गीकरणे मंजूर व्हावीत, याकरिता सर्वपक्षीय नेत्यांकडून दबाव येत असल्याने प्रभागांमधील सहयादीतून निधी देण्याचे स्थायी समितीने ठरविले आहे. त्यानुसार विविध कामांसाठी तब्बल बारा कोटी रुपयांचा निधी वळविण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

प्रभागांमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी नगरसेवकांनी ठराव दिले आहेत. प्रभाग १८ आणि ३८ मध्ये ही कामे केली जाणार आहेत. यासाठी लाखो रुपयांचा निधी देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

प्रभागांमधील कामांसाठी त्याच प्रभागातील नगरसेवकांची सुचविलेल्या कामांचा निधी दिला जाईल. मूळ अर्थसंकल्पातील योजनांचा निधी देणार नाही. ज्यामुळे अर्थसंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होईल. या ठरावाबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती