आमदार सुमन पाटील यांच्या मोटारीला अपघात

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 24 मे 2017

घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी पोचले. नदीच्या पुलावर रुंदी कमी असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहय्याने बाजूला केली. त्या वाहतूक कोंडी दरम्यान, कॉंक्रीटचा मिक्‍सर, पीएमपी बस बंद पडली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली.

वारजे माळवाडी : पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर वारजे माळवाडी येथील मुठा नदीच्या पुलावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुमन रावसाहेब पाटील यांच्या वाहनाला बुधवारी संध्याकाळी सहा वाजता किरकोळ अपघात झाला.

आमदार पाटील या माजी उपमुख्यमंत्री कै. आर.आर.(आबा) पाटील यांच्या पत्नी आहेत. हा अपघात झाला त्यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत मुलगा रोहित व पुतण्या रोहन (दोघांचे वय 23) व चालक असे चौघेजण गाडीत होते.

त्या इनोव्हा गाडीने ( क्रमांक एम एच 10 बी एम 3758) साताऱ्याकडे जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पुढील चाक पंक्‍चर झाले. त्यानंतर मागील चाक देखील पंक्‍चर झाले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, गाडी चालकाच्या बाजूने पुलाचा कठड्याला घासत गेली. त्यानंतर, गाडी थांबली. पुलाच्या कठड्याच्या लगत दुसऱ्याबाजूचा पूल आहे. त्यामुळे ती जागा अधिक सुरक्षीत होती. मोटारीतील सर्वजण सुरक्षीत आहेत. त्यानंतर, पंधरा- वीस मिनीटात दुसरी मोटार आली. त्या मोटारीने सातारा तासगावच्या दिशेने गेल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्त मोटार तातडीने गॅरेजमध्ये पाठविली. अशी माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव मोळे यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी पोचले. नदीच्या पुलावर रुंदी कमी असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहय्याने बाजूला केली. त्या वाहतूक कोंडी दरम्यान, कॉंक्रीटचा मिक्‍सर, पीएमपी बस बंद पडली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली.

साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आठ वाजेपर्यंत वाहतूक दररोजपेक्षा संथ गतीने सुरु होती. अखेर वाहतूक पोलिसांनी वाहतूक ती दोन वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

आम्ही सर्वजण सुरक्षित- आमदार सुमन पाटील

'चाक पंक्‍चर झाल्याने किरकोळ अपघात झाला. वाहनाचा वेग देखील कमी होता. वाहन कठड्यालगत थांबले. चालकासह आम्ही चौघेजण सुरक्षित असून तासगावच्या दिशेने येत आहे.'' अशी माहिती आमदार पाटील यांनी "सकाळ'चे तासगावचे प्रतिनिधी रविंद्र माने यांच्याशी बोलताना दिली.