जिल्ह्यातील "शिक्षण हक्क'च्या 30 टक्के जागा रिक्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - शिक्षण हक्क कायद्यातील खासगी शाळांमधील राखीव 25 टक्के जागा राज्यभरात कुठेच पूर्णतः भरलेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यातील 30 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. जिल्ह्यात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे. 

पुणे - शिक्षण हक्क कायद्यातील खासगी शाळांमधील राखीव 25 टक्के जागा राज्यभरात कुठेच पूर्णतः भरलेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यातील 30 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. जिल्ह्यात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे. 

पुणे जिल्ह्यातील 849 खासगी शाळांमध्ये एकूण 15 हजार 693 राखीव जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा फेऱ्या घेतल्या आहेत, तरीही सर्वच जागांवर प्रवेश झालेले नाहीत. जिल्ह्यात या वर्षी 10 हजार 986 विद्यार्थ्यांनी या जागांवर प्रवेश घेतला आहे. सुमारे चार हजार सातशे जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी आठ हजार 899 जागा भरल्या होत्या. त्या तुलनेत या वर्षी प्रवेशित जागांचा आकडा वाढल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. 

पुण्यात सर्वाधिक प्रवेश 
राज्यात या वर्षी एक लाख 20 हजार 822 राखीव जागा आहेत. कोणत्याही जिल्ह्यात त्या पूर्णांशाने भरलेल्या नाहीत. राज्यात सरासरी 53 टक्के म्हणजे 63 हजार 896 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण हे वर्धा जिल्ह्यातील आहे. त्या खालोखाल नागपूर, भंडारा, अकोला, धुळे जिल्हा आहे. पुणे टक्केवारीच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर दिसत असले, तरी राज्यात सर्वाधिक राखीव जागा याच जिल्ह्यात आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्याही पुणे जिल्ह्यातच अधिक आहे. 

पालकांचा चांगल्या शाळांकडे कल 
राखीव जागांवरील प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसले, तरी पुणे जिल्ह्यात 30 टक्के जागा रिक्त का, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, "पालकांचा कल चांगल्या शाळांकडे असतो,' असे त्यांचे निरीक्षण आहे. पालकांनी 30 टक्के शाळांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत तेथे प्रवेश नाकारले असावेत, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. 

जिल्हा रिक्त जागा प्रवेश टक्केवारी 
पुणे 15,693 10,986 70 
नागपूर 7099 6047 85 
वर्धा 1567 1392 89 
भंडारा 917 730 80 
अकोला 2382 1789 75 
धुळे 1134 893 79 

Web Title: pune news RTE