आयोजकांनीच साहित्य संमेलन नाकारावे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे - ""संमेलन स्थळामुळे सध्या सुरू असलेला वाद थांबविण्यासाठी बुलडाण्यातील हिवरा आश्रम या आयोजक संस्थेने स्वत:हून साहित्य संमेलन नाकारावे,'' असे पत्र माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आयोजक संस्थेला पाठवले आहे. त्यामुळे आयोजक संस्था आता कोणते पाऊल उचलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

पुणे - ""संमेलन स्थळामुळे सध्या सुरू असलेला वाद थांबविण्यासाठी बुलडाण्यातील हिवरा आश्रम या आयोजक संस्थेने स्वत:हून साहित्य संमेलन नाकारावे,'' असे पत्र माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आयोजक संस्थेला पाठवले आहे. त्यामुळे आयोजक संस्था आता कोणते पाऊल उचलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

आगामी साहित्य संमेलनासाठी दिल्ली, बडोदा, हिवरा आश्रम (बुलडाणा) येथून निमंत्रणे आली होती. त्यापैकी दिल्लीने आधीच आपले निमंत्रण मागे घेतले. त्यामुळे साहित्य महामंडळाने हिवरा आश्रमावर शिक्कामोर्तब केले; पण हिवरा आश्रमाची पार्श्‍वभूमी वादग्रस्त असल्याचे समोर आल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संमेलन स्थळाला विरोध दर्शविला. बऱ्याच लेखकांनीही "धार्मिक आश्रमात संमेलन नको' अशी परखड भूमिका मांडली. त्यामुळे संमेलनाचा वाद आत्तापासून सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, सबनीस यांनी वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

सबनीस म्हणाले, ""संमेलन स्थळावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत खंत वाटते. स्वामी विवेकानंदांच्या आश्रमाबाबत बदनामी करणे योग्य नाही. स्वामी विवेकानंद हे अंधश्रद्ध नव्हते. तरीही वाद सुरू आहे. पण तो संवादातून मिटवता येऊ शकतो. आयोजकांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वत:हून नाकारून आयोजकांनी तेथे विवेकानंदांच्या नावाचे विचार संमेलन घ्यावे.'' "हिवरा आश्रमात अंधश्रद्धा नाही', असे अंनिसचे कार्यकर्ते सांगत आहेत, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती "आश्रमात अंधश्रद्धा आहे' असे सांगत आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी कुठली संस्था विवेकवादी आहे, असा प्रश्‍न महाराष्ट्राला पडला आहे, असेही ते म्हणाले. 

महामंडळ म्हणतेय, "वेट ऍण्ड वॉच' 
""हिवरा आश्रमाने साहित्य संमेलन नाकारले, तर साहित्य महामंडळाचे संमेलनविषयक नियम पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत "वेट ऍण्ड वॉच,'' अशी भूमिका साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मांडली. 

Web Title: pune news sahitya sammelan shripal sabnis