चुकलेल्या बाराशे वारकऱ्यांना दिंडीत सुखरूप पोचविले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

सासवडपासून सुरू केलेल्या या उपक्रमाची वाखरी (जि. सोलापूर) येथे सांगता झाली. दिंड्यांची संख्या वाढल्यामुळे चुकलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी सोहळ्याचे मानकरी बाबूराव चोपदार यांनी दिड्यांचे प्रत्येक मुक्कामाचे पत्ते संकलित केले. "सकाळ सोशल फाउंडेशन' आणि चोपदार फाउंडेशनने यात पुढाकार घेतला.

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन आणि चोपदार फाउंडेशन यांनी राबविलेल्या "जाऊ देवाचिया गावा' या उपक्रमाच्या माध्यमातून आषाढी वारीत चुकलेल्या सुमारे 1248 वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत सुखरूप पोचविण्यात आले. 

सासवडपासून सुरू केलेल्या या उपक्रमाची वाखरी (जि. सोलापूर) येथे सांगता झाली. दिंड्यांची संख्या वाढल्यामुळे चुकलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी सोहळ्याचे मानकरी बाबूराव चोपदार यांनी दिड्यांचे प्रत्येक मुक्कामाचे पत्ते संकलित केले. "सकाळ सोशल फाउंडेशन' आणि चोपदार फाउंडेशनने यात पुढाकार घेतला. चुकलेल्या वारकऱ्यांना केवळ पत्ता न सांगता त्यांच्यासोबत स्थानिक विद्यार्थी देऊन त्यांना दिंडीपर्यंत पोचविण्यात येते. प्रत्येक मुक्कामाच्या गावात माउलींच्या पालखीजवळ हे केंद्र असते. 

"सकाळ'चे उपसंपादक शंकर टेमघरे यांनी या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रवीण ठुबे, अर्जुन लांडे, उमेश पांढरे, भैरवनाथ चंदनकर यांच्यासह सात विद्यार्थी पूर्णवेळ कार्यरत होते. "सकाळ सोशल फाउंडेशन'चे वरिष्ठ व्यवस्थापक उद्धव भडसाळकर, तसेच चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांनी संयोजन केले. "सकाळ'चे ठिकठिकाणचे वार्ताहर, सुमारे साडेतीनशे विद्यार्थी आणि शिक्षकांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. 

"जाऊ देवाचिया गावा' या उपक्रमासह सर्व संगणकीय यंत्रणा चोपदार फाउंडेशनने उभारली असून, त्यांच्याद्वारे वारीच्या काळात दिंड्यांना आलेल्या वस्तुरूपी भेट वितरित करण्यात आल्या. बारामतीतील मुक्ती ग्रुप यांच्या वतीने प्रफुल्ल तावरे यांच्या उपस्थितीत चोपदार फाउंडेशनला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. युवराज ढमाले यांच्यातर्फे ताडपत्र्या आणि सतरंज्या तसेच विंटो जिनो कंपनीतर्फे दहा हजार प्लॅस्टिकचे कागद दिंड्यांना वितरित करण्यात आले. वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या चोपदार फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना रेनकोट वाटप करण्यात आले.