सासवडमध्ये 42 ठिकाणी सापडल्या डेंगीच्या अळ्या

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

आता कुठे गावठाणाचा सर्वे झाला, वाढीव हद्दीत आणखी आकडेवारी वाढणार, तापासह कीटकजन्य आजाराचाही फैलाव

सासवड, (ता. पुरंदर) : येथे शहरात `डेंगी`चा संसर्ग व तत्सम सदृश्य रुग्ण, चिकुन गुनियाचे व विषाणुंचा संसर्ग असणारे रुग्ण वाढतच आहेत. दरम्यान सासवड गावठाणात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात 42 ठिकाणी डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांच्या आळ्या सापडल्या. तर शहराच्या वाढीव हद्दीत त्यामुळे सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे, असे आज सासवड नगरपालिका आरोग्य विभागाकडून सांगितले गेले. 

याबाबत सासवड नगरपालिकेचे सत्ताधारी आघाडीतील अभ्यासू नगरसेवक संजय ग. जगताप यांनी स्वतः या सर्वेक्षणात पाहणी केली. तेंव्हा अनेक घरांच्या साठवण टाकीत, साठलेल्या पाण्यात डेंगीचा फैलाव करणाऱया डासांच्या आळ्या आढळल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मी स्वतः या तापाने आजारी होतो व अजूनही हात - पाय जाम आहेत., असे सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बंडुकाका जगताप यांनी सांगितले की., आरोग्याचा प्रश्न सासवडमध्ये गंभीर आहे. मी चिकून गुनियाने जाम असून एेन दिवाळीत रुग्णालयात आहे. यावर प्रसार माध्यमांनी काही तरी मार्ग काढावा व सामान्य लोकांचे या आजारावर होणारे पैसे वाचवावेत. किटकजन्य आजाराबरोबरच हवेतून पसरणाऱया विषाणूंचा संसर्ग सासवड शहरात नुकत्याच झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ताप, थंडी, सर्दी, खोकला, डोकेदुखकी, सांधेदुखी आदी लक्षणांचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.     

चिंतामणी हाॅस्पीटलचे एक तज्ज्ञ डाॅक्टर भास्कर आत्रम यांनी रुग्णांची आकडेवारी प्रचंड वाढत असल्याच्या प्रकारास दुजोरा दिला. तसेच रुग्ण दाखल करुन घेण्यास जागाच उरली नसल्याचे सांगितले. दरम्यान काही गल्लीत तर पूर्ण कुटुंबे आजारी आहेत. तर काही डाॅक्टर, लोकप्रतिनीधीही जखडले गेले आहेत. सासवड शहरातील काही रुग्णालयात भेट दिली असता.. रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी खाटाही शिल्लक नसल्याचे दिसून आले. काही कुटुंबांत तर सारेच्या सारे एकामागे एक तापाने जखडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबिय शारीरीक, आर्थिक, उपचारात वेळ जात असल्यानच्या समस्याने ग्रासले आहेत. विश्रांती घेतलेल्या पावसाने बरी हजेरी लावली.. अन् तेंव्हापासून गेली अडीच महिने तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर पावासाचे पाणी विविध ठिकाणी व टाकाऊ वस्तूंमध्ये साचल्याने, तसेच त्याची स्वच्छता वेळेत न झाल्याने अगोदरच झालेली डेंगीच्या डासांची उत्पत्ती पुन्हा वाढली.

रुग्णांचे ठोस आकडे संकलन शासनाच्या किंवा जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणाअभावी मिळेनात. मात्र येथे शहरात कोणत्याही खासगी रुग्णालयात गेले की, डेंगी किंवा डेंगी सदृश्य रुग्ण दाखल असलेले मोठ्या प्रमाणात दिसते आहे. अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी `सकाळ`शी बोलताना डेंगी व विषाणूंच्या संसर्गातून आणि किटकजन्य आजारावर उपाययोजना होण्याबाबत मागणी मांडली. अनेक डाॅक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी यास दुजोरा दिला. पालिका आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण म्हणाले., आता केवळ सासवड शहरातील गावठाणाचा सर्वे झाला व त्यात 42 ठिकाणी डेंगीचा फैलाव करणाऱया डासांच्या आळ्या सापडल्या. वाढीव हद्दीत तर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकात्मिक पध्दतीने साऱया यंत्रणांचा सर्वे व्हायला हवा., असे जाणकारांचे म्हणणे आहे.