अधिसभेसाठी "काउंटडाउन' सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी (ता. 27) जाहीर होईल. रविवारी (ता. 19) चौदा जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्यापैकी अधिसभेत निवडून कोण जाणार हे निश्‍चित होईल.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी (ता. 27) जाहीर होईल. रविवारी (ता. 19) चौदा जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्यापैकी अधिसभेत निवडून कोण जाणार हे निश्‍चित होईल.

अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधीच्या चार जागा आणि नोंदणीकृत पदवीधरच्या दहा जागांसाठी मतदान झाले होते. विद्यापीठाच्या परिसरातच मोजणी होणार असून, प्रशासनाने मतमोजणीच्या प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरून आलेल्या मतपेट्या विद्यापीठात जमा केलेल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर त्या पेट्या उघडल्या जातील.

पसंतीक्रमानुसार मतदानपद्धती असलेल्या, सुरवातीला कमी मतदान असलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघाची मतमोजणी होईल. या मतदारसंघात 228 जणांनी मतदान केले. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाल्यानंतर या मतदारसंघातील पहिला निकाल हा अकराच्या सुमारास हाती येईल. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाचा पहिला निकाल हाती येण्यास सायंकाळ होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गुप्त मतदान पद्धतीचा भंग झाल्याची तक्रार
अधिसभा निवडणुकीसंबंधी विद्यापीठ विकास मंच एकता पॅनेलने नाशिक येथे एका संस्थाचालकाच्या नावाने बोगस मतदान झाल्याची तक्रार केली होती. तसेच, नगर जिल्ह्यातील राहाता, शेवगाव येथील मतदान केंद्रांवर 90 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाल्याबद्दल संशय व्यक्त केला होता. यात आणखी एक भर पडली आहे. विद्यापीठ प्रशासनाने गुप्त मतदान पद्धतीचा भंग केल्याचे विद्यापीठ विकास मंडळाचे उमेदवार भारत कर्डक यांनी म्हटले आहे. मतपत्रिकेच्या "काउंटर स्लीप'वर छापील क्रमांक असल्याने मतदाराला स्वखुशीने मतदान करता येत नाही. याबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: pune news savitribai phule university election result