बुद्धिप्रधान व भावपूर्ण गायनवादनाची अनुभूती 

बुद्धिप्रधान व भावपूर्ण गायनवादनाची अनुभूती 

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राचे प्रथम पुष्प पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांनी गुंफले. वसुंधरा कोमकली व पं. मधुप मुद्‌गल यांचे शिष्य असलेल्या भुवनेशजींनी आपल्या गायनाची सुरवात राग मुलतानीने केली. गरेनीसा, मेगरेसा, गमपमगरेसा, नीसागरेनीसा या स्वरांमधून नोमतोम्‌युक्त आलापीने रागस्वरूप स्पष्ट दाखवल्यानंतर त्यांनी विलंबित एकतालातील "बेगी आरे साईयॉं' हा पारंपरिक बडा ख्याल मांडणीसाठी घेतला. षड्‌ज, पंचम न्यास ठेवून या गंधार निषाद चलित ठेवून बोल आलापांद्वारे राग बढत केली गेली. वाढलेल्या लयीत विविध लयकारीयुक्त बोलताना, सरळ, सपाट, अवरोही वेगवान तानक्रिया यामधून मुलतानीची रंगत अधिकच वाढली. विलंबितानंतर कुमारजींच्या "दिल बेकरार' त्रितालातील बंदिश छोटे बोलआलाप, बेहेलावे, पालुपदे, तिहाया याद्वारे रंगवली. त्यानंतर त्यांनी कुमारजींच्या नंद-केदार या जोड रागातील "ला दे बिरा म्हारी चुनरी' हा मध्यलय त्रिताल थेट कुमारजींच्या शैलीत रंगवला. सामपऽगमपरेसा, मपधपमऽ गमधपरेसा, मऽपधनीधपम यासारख्या स्वराकृतींमधून नंद-केदारचे यथार्थ दर्शन त्यांनी घडवले. यालाच जोडून केदार रागातील कुमारजींची स्थायी व अंतरा या दोन्हीची सम ताल षड्‌जावर असलेली उत्तरांग प्रधान बंदिश "छैला तुमी कै भटक रिन्हो' ही बंदिश ताकदीने पेश केली. आपल्या गायनाचा शेवट त्यांनी सतवा तालातील "आज निज घट बिच फाग मचै हो' या मिश्र काफीमधील माळव्यातील लोकधून गाऊन केली. त्यांना समर्पक अशी तबलासाथ प्रशांत पांडव यांनी, तर गायनाला पोषक अशी संवादिनी साथ सुयोग कुंडलकर यांनी केली. विनय चित्राव व रामानुज विपट यांनी तानपुरा साथ केली. 

यानंतर टी. एन. कृष्णन्‌, एन राजम्‌ व पं. जसराज यांच्या शिष्या असलेल्या व्हायोलिनवादिका कला रामनाथ यांनी आपल्या वादनाची सुरवात शामकल्याण रागातील विलंबित एकतालाने केली. पनीसारेनीसा, रेनीधपसा, पगमरे, रेमपगमरेसा सापमप, रे मप, रेनीसा - धमप, सारेनीसाप या स्वरबंधातून शामकल्याणची बढत केली. पंचम-निषादावरील ठेहेराव, सारेसासा-पधपप असे खास ग्वाल्हेरी खटके तर नीनीसासा पनीनीसा या स्वराकृतीतून मेवाती घराण्याच्या तालमीचा प्रयत्न येत होता. त्यानंतर त्यांनी मध्य लय त्रिताल द्रुत एकताल व द्रुत त्रिताल अशा तीन गती सादर केल्या. अतिद्रुत त्रितालातील तंतकारी अंगाने केलेले वादन; तबल्याबरोबरचे सवाल जबाब रंगले. आपल्या वादनाचा शेवट त्यांनी केरव्यातील कजरीधुन वाजवून केली. योगेश समसी यांनी त्यांना पूरक, रंगतदार तबलासाथ केली. तानपुरा साथ वैशाली कुबेर व वैष्णवी अवधानी यांनी केली. 

यानंतर पतियाळा घराण्याच्या रसिकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे टाळ्यांच्या गजरात स्वरमंचावर आगमन झाले. आपल्या गायनाची सुरवात त्यांनी मारूविहाग रागातील ""रतिया हमारी बैरन भई' या विलंबित एकतालातील बड्या ख्यालाने केली. आकर्षक बोल आलाप मध्य सप्तकातील षड्‌जावरचा ठेहेराव, मेरखंड पद्धतीने केला जात असलेला स्वरविस्तार, गगग ममम गगग अशा भारदस्त गमका, सरगमची तिस्त्र जातीच्या वैविध्य असलेल्या लयकाऱ्या आवाजाच्या लहान-मोठेपणाचा उपयोग करून घेतलेल्या मंद्र पंचम ते अतितार षड्‌जापर्यंतच्या अवाका असलेल्या अतिवेगवान ताना यामुळे मारूबिहाग बहारदार रंगला. जोड म्हणून "रतिया किन्ही भोर' हा त्रिताल आपल्या खास शैलीत वैविध्यपूर्ण सरगमने रंगवला. मारूबिहाग नंतर बागेश्रीचा झपतालातील तराणा "दीर तोम तनन तन देरेना' पेश केला. तराण्याचे बोल तानेत गुंफून केलेली बढत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेली. त्यानंतर द्रुत एकतालातील बंदिश "याद करो, ध्यान धरो माता सरस्वती' तितक्‍याच समर्थपणे सादर केली. आपल्या गायनाचा शेवट त्यांनी "याद पिया की आये' या ठुमरीने केला. सोहनी, तोडी रागांचे बेमालुम मिश्रण, वेगवेगळे काकुप्रयोग यांनी ठुमरी गायन रंगले. त्यांना पूरक अशी संवादिनी साथ अजय जोगळेकर यांनी, तर गायनास पोषक तबला साथ सत्यजित तळवळकर यांनी केली. तानपुरा साथ मेघोदीपा गांगुली व अनुजा भावे यांनी केली. 

या सत्राचे शेवटचे पुष्प पं. जसराजजींनी गुंफले. शंकरा रागातील "शिवशंकर महादेव' हा विलंबित एकताल सासा गग पप पधपप सारेसासा यासारख्या वजनदार आकृती बंधातून रंगवला. त्याला जोड म्हणून "विभूषित अंग रिपुत्तमनग' हा त्रिताल आपल्या खास शैलीत मांडला. त्यानंतर खमाज बहार रागातील "एरिमा सकल बन गगन पवन चलत पुरवाई' हा त्रिताल पेश केला. निधनीसानीनीनीसा या स्वराकृतीतून भुंग्यांच्या गुंजनाचा आभास निर्माण केला. खमाजबहारनंतर त्यांनी नायकीकानड्यातील मध्यलय एकतालातील "तेरो ध्यान' ही बंदिश पेश केली व त्यालाच जोडून सुघराई रागातील तराणा सादर केला. आपल्या गायनाची समाप्ती त्यांनी "गोविंद दामोदर माघवेती' या भजनाने केली. 

त्यांना संवादिनी व तबल्याची पूरक साथ अनुक्रमे मुकुंद पेटकर व केदार पंडित यांनी, मृदंगम्‌ची साथ श्रीधर पार्थसारथी तर स्वरसाथ अंकिता जोशी, रतन मोहन शर्मा व तानपुरा साथ सुरेश पत्की व सिमंतिनी ठकार यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com