मुलांची ‘दम’छाक!

मुलांची ‘दम’छाक!

पुणे - शाळेत जाणारी दहा टक्के मुले दम्यासारख्या श्‍वसनाच्या विकारांनी त्रस्त आहेत. तर शहरात श्‍वसन विकाराचे एकूण प्रमाण २६ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. हवेत वेगाने वाढणाऱ्या धुळीचा हा दुष्परिणाम असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे शाळकरी मुलांच्या फुफ्फुसाची क्षमताही कमी होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’तर्फे (सफर) नोंदविलेल्या निरीक्षणातून दिल्ली हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथे हवेत धूलिकणांचे प्रमाण (पीएम १०) १८३ मायक्रोग्रॅम प्रतिघन मीटर आणि अतिसूक्ष्म धूलिकणांच्या (पीएम २.५) प्रमाणाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. तेथे ‘पीएम २.५’चे प्रमाण ३०९ मायक्रोग्रॅम प्रतिघन मीटर आहे.

पुण्यात हे प्रमाण सध्या त्या तुलनेत कमी असले, तरी त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा दुष्परिणाम थेट पुण्यातील नागरिकांच्या, लहान मुलांच्या आणि गर्भवतीच्या आरोग्यावर होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

गर्भवतींच्या आरोग्यावर धुळीचा दुष्परिणाम
जन्माच्या आधीपासून हवेतील तरंगत्या धूलिकणांचा परिणाम गर्भवतीच्या पोटातील बाळावर होत असल्याचे शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. गर्भवतीच्या रक्तातील प्रदूषित घटक गर्भात जातात. त्यामुळे नवजात अर्भकांच्या फुफ्फुसावर दुष्परिणाम झाल्याचे दिसत आहे. मुलांची फुफ्फुसे पूर्ण विकसित झालेली नसतात. वाढत्या वयात फुफ्फुसांच्या विकासांवर प्रदूषणाचा दुष्परिणाम होतो. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपासून हा परिणाम मुला-मुलींवर होताना दिसत आहे. यातील २६ टक्के मुलांना भविष्यात दीर्घकालीन श्‍वसनाचा परिणाम होतो, अशी माहिती राष्ट्रीय वायू प्रदूषण संशोधन संस्थेचे सदस्य आणि बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी दिली.

प्रदूषणाचा दुष्परिणाम
    मृत बाळे जन्माला येणे
    जन्मतः बाळाचे कमी वजन असणे
    पूर्ण दिवस भरण्याआधी प्रसूती होणे
    दम्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढणे
    हृदयविकार, हृदयाचे ठोके अनियमित होणे

असा करा बचाव
    एन ९५ प्रकारचा मास्क घालावा
    प्रदूषणाची पातळी बघून बाहेर पडावे
    वाहतुकीच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे

हे करा ...
    कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा
    तुळशीचे रोप घरात असावे
    बांधकाम करताना पत्रे, पडदे लावावे

प्रदूषणाचा थेट दुष्परिणाम?
वाहतूक पोलिस, पीएमटी वाहक, चालक यांना श्‍वसनाचे आणि दम्याचे विकार होण्याची शक्‍यता तिपटीने वाढल्याची भीती एका संस्थेने केलेल्या अभ्यासातून व्यक्त केली आहे. रिक्षाचालक, दुचाकीधारक आणि त्या खालोखाल शाळकरी मुलांना दमा होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ 
पुण्यात २००३ च्या तुलनेत २००८मध्ये लहान मुलांमधील दमा आणि श्‍वसनाच्या संबंधित विकारांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. हे प्रमाण तीन टक्‍क्‍यांवरून सहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. गेल्या नऊ वर्षांमध्ये हे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

नवजात बालकाच्या फुफ्फुसांची वाढ आणि विकासावर प्रदूषणाचा दुष्परिणाम होत असतो. त्यातून मुलांना मोठेपणी दीर्घकालीन श्‍वसनाचे विकार होतात. वाढत्या वयात श्‍वसनाचे वेग जास्त असतो. त्यामुळे लहान मूल मिनिटाला ३० ते ४० श्‍वास घेते. मूल जेवढे लहान तेवढा श्‍वसनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे जास्त प्रदूषित हवा लहान मुलांच्या फुफ्फुसात जाते. सूक्ष्म धूलिकणांमुळे श्‍वासनलिकेच्या अंतःत्वचेला दीर्घकालीन सूज येते. हे दम्याचे मूळ आहे. कालांतराने श्‍वसनमार्गाची लवचिकता जाते.
- डॉ. प्रमोद जोग, राष्ट्रीय अध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना

विकास महत्त्वाचा आहे; पण तो होत असतानाच पर्यावरणाचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. हवेतील वायूंचे आणि धूलिकणांचे प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक प्रभावी उपाय आहे. त्यातून सार्वजनिक आरोग्य चांगले ठेवला येईल.
- डॉ. संदीप साळवी, संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com