सुरक्षेच्या कारणावरून भाविकांची अडवणूक 

सोमवार, 17 जुलै 2017

गुंड (जि. गांदरबल) - अमरनाथ यात्रेवरून श्रीनगरकडे जाणाऱ्या भाविकांची सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांकडून आज अडवणूक करण्यात आली. सोनमार्गच्या पुढे वीस किलोमीटर अंतरावर गुंडजवळ दुपारी बारापासून अनेक गाड्या रोखून धरल्या होत्या. 

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाल्याने भाविकांना केवळ पहाटे चार ते दुपारी एक वाजेपर्यंत सोडणार, असे पोलिस तोंडी सांगत होते. 

गुंड (जि. गांदरबल) - अमरनाथ यात्रेवरून श्रीनगरकडे जाणाऱ्या भाविकांची सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांकडून आज अडवणूक करण्यात आली. सोनमार्गच्या पुढे वीस किलोमीटर अंतरावर गुंडजवळ दुपारी बारापासून अनेक गाड्या रोखून धरल्या होत्या. 

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाल्याने भाविकांना केवळ पहाटे चार ते दुपारी एक वाजेपर्यंत सोडणार, असे पोलिस तोंडी सांगत होते. 

याबाबत आम्हाला काहीच माहिती दिली नसल्याची तक्रार भाविकांनी केली. अनेकांना पुन्हा सोनमार्गला मुक्कामी पाठवले. उद्या (ता.17) पहाटे चारपासून दुपारी केवळ एक वाजेपर्यंत श्रीनगरकडे गाड्या सोडणार असल्याचा तोंडी फतवा काढून पोलिस अधिकारी भाविकांना धमकावत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. 

यात्रेला गेलेल्या भाविकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यात्रेसाठी अनेक दिवस ते घरापासून दूर आहेत. घराच्या ओढीने हे नागरिक निघाले असतानाच गुंड गावापासून पुढे निर्जन ठिकाणी लोकांची अडवणूक केली जात होती. काही भाविक मुंबईचे होते. त्यांना दोन तासांपासून रोखून धरले होते. 

पोलिसांना अनेकदा विनवणी करूनही त्यांनी सोडले नाही. अखेर वैतागून या नागरिकांनी त्यांची गाडी सोडून दिली आणि ते पायी श्रीनगरच्या दिशेने निघून गेले. कीर्ती आगरवाल हे उत्तराखंड येथून आले होते. त्यांचे परतीचे विमान उद्या (ता.17) सकाळी सात वाजता आहे. सोनमार्गहून सकाळी सातपर्यंत विमानतळावर कसे पोचायचे, असा त्यांचा प्रश्न होता. 

पोलिस पैसे घेऊन वाहनांना सोनमार्गहून सोडत असल्याचा आरोप करणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी मारहाण केली. मी कोणी चोर नाही, तर वाहनचालक आहे, असे म्हणत असताना पोलिसांनी त्याला मारहाण करीत ताब्यात घेतले. 

काही लोकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर सोडण्यात आले; पण श्रीनगरजवळ गांदरबल येथे पुन्हा गाड्या अडविण्यात आल्या. या ठिकाणी देखील भाविक पुढे जाऊ देण्याची विनवणी करीत होते. स्थानिक नागरिकांना मात्र अडविले जात नव्हते. दोन तासांनंतरही पोलिस सोडत नसल्याने पोलिसांबरोबर नागरिकांची हुज्जत सुरू झाली. नंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास सर्वांना सोडण्यात आले. 

पोलिसांचा जाच नको 
सोनमार्गहून पहाटेनंतर भाविकांना सोडण्यात येते. भाविकांच्या गाड्यांबरोबर एक लष्कराची गाडी दिली जाते. श्रीनगरहून अमरनाथकडे जाणाऱ्या पहाटे पाचनंतर दुपारी दोन वाजेपर्यंत लष्कराच्या संरक्षणात सोडले जाते. भाविकांनी या वेळा स्वीकारल्या असल्या, तरी पोलिसांच्या त्रासाबद्दल भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पोलिसांचा हा जाच कशासाठी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.