ज्येष्ठ वकिलाला मारहाणीचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे - ज्येष्ठ वकिलाला झालेल्या मारहाणी विरोधात वकिलांनी सोमवारी न्यायालयाच्या कामकाजात सहभाग न घेऊन निषेध नोंदविला. मारहाणीच्या प्रकाराचा राज्यातील इतर जिल्ह्यातील वकिलांनीही निषेध केला आहे. 

पुणे - ज्येष्ठ वकिलाला झालेल्या मारहाणी विरोधात वकिलांनी सोमवारी न्यायालयाच्या कामकाजात सहभाग न घेऊन निषेध नोंदविला. मारहाणीच्या प्रकाराचा राज्यातील इतर जिल्ह्यातील वकिलांनीही निषेध केला आहे. 

गेल्या आठवड्यात ऍड. राजेंद्र विटणकर यांना माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी मारहाण केली होती. मात्र अद्याप त्यांना अटक झाली नाही. याप्रकरणी तपासात काय प्रगती केली याचा जाब पोलिसांना विचारावा, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने जिल्हा मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्याकडे केली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाप्रमाणेच इतर न्यायालय, तालुका न्यायालयातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. कोणत्याही वकिलाने गायकवाड यांचे वकीलपत्र स्वीकारू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनने केले आहे. तसेच पत्र असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांच्या संघटनेलाही पाठविले आहे. 

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोरील हिरवळीवर दुपारी वकिलांची सभाही झाली. विटणकर यांनी घडलेल्या घटनेची माहिती सर्वांना दिली. अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, एन. डी. पाटील, औदुंबर खुने-पाटील, बिपिन पाटोळे, अशोक संकपाळ, एकनाथ जावीर, शिरीष शिंदे, मोहन वाडेकर, शाहीद अख्तर, सुभाष पवार, सतीश पैलवान, राणी कांबळे, विजयालक्ष्मी भगत यांनी या वेळी भाषणे केली. मारहाणीच्या घटनेचा उस्मानाबाद, धुळे, नगर, सातारा, जळगाव आदी जिल्ह्यातील वकील संघटनांनी निषेध केल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत झंजाड यांनी दिली. 

वकिलांसाठीही संरक्षण कायदा करा 
डॉक्‍टरांप्रमाणेच वकिलांसाठी संरक्षण कायदा करावा , उच्च न्यायालयाप्रमाणे जिल्हा न्यायालयातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी, अशी मागणी करण्यात आली, अशी माहिती हेमंत झंजाड यांनी दिली.