राज्य मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन यंदा शिर्डी येथे

मिलिंद संधान
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

विविध उपक्रमांचे अध्ययन, अध्यापनावर होणारे परिणाम व उपाययोजना या विषयांवर निबंध सादर करुन खुली चर्चा होणार आहे.

नवी सांगवी : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५७ वे शैक्षणिक राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवार (ता. २७) पासून शिर्डी येथे सुरू होत आहे.

साईनगरीत रविवार (ता. २९) या तीन दिवसापर्यंत आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, साईसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यासह शिक्षण खात्यातील अधिकारी व शिक्षण तज्ञ उपस्थित रहाणार आहेत.

अधिवेशन काळात संगणकीय ऑनलाईन माहिती व नोंदी भरण्यातील अडचणी, दोष, समस्या व उपाय योजना, प्रचलित मूल्यमापणाची कार्यपध्दती व अंमलबजावणीतील दोष, अडचणी व उपाययोजणा, अशैक्षणिक ज्यादा कामे, विविध दिनविशेष व उपक्रमांचे अध्ययन अध्यापनावर होणारे परिणाम व उपाययोजना या विषयांवर निबंध सादर करुन खुली चर्चा होणार आहे.

त्यानंतर विविध शैक्षणिक ठराव शासनास सादर करण्यासाठी सर्वानुमते मंजुर केले जाणार आहेत. अशी माहिती संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक रावसाहेब आवारी, संमेलनाध्यक्ष आबासाहेब जंगले, सचिव नंदकुमार बारवकर, राजेश गायकवाड, के एस ढोमसे यांनी सांगवीतून प्रसिध्द केलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :