एकावन्न फूट गुढी अन्‌ ३५१ ढोल-ताशांचा गजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

पुणे - ५१ फूट उंच उभारली जात असलेली स्वराज्य गुढी... त्या वेळी होत असलेला तब्बल ३५१ ढोल-ताशांचा गजर... पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले ‘मावळे’... ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा... शिवबांची महती सांगणाऱ्या पोवाड्यांचे गायन... अशा प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात शनिवारवाड्याच्या प्रांगणात स्वराज्य दिन सोहळा साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाल्याच्या घटनेला ३४४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीतर्फे हा ‘आनंदसोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यात ‘रुद्रगर्जना’, ‘नादब्रह्म’, ‘गुरुजी’, ‘शिवराय’, ‘शिवगर्जना’, ‘नूमवि’ हे ढोल पथक सहभागी झाले होते. त्यांच्या वादनाबरोबर काही पथकांनी तलवार बाजी आणि लाठी युद्ध अशा मर्दानी खेळांचे सादरीकरण करून सोहळ्यात आनंदाचे रंग भरले.

या वेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड उपस्थित होते. बलकवडे म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. यातून समाजासमोर आदर्श निर्माण केला. तो आपण कायम समोर ठेवला पाहिजे.’’ 

मोरे म्हणाले, ‘‘चांगला महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत.’