बदलाचे साक्षीदार व्हा - खाडिलकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘मुलगी दत्तक घेणे ही बदलत्या काळात नवलाची गोष्ट राहिलेली नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही याद्वारे जुळणारे बंध अधिक परिपक्व असतात. म्हणूनच दत्तक असो वा पोटची मुलगी, तिला जगण्याचा अधिकार आपण द्यायलाच हवा. ‘सकाळ’ने सुरू केलेली मोहीम बदलांचेच पाऊल म्हणावे लागेल. हा उपक्रम स्तुत्य असून, प्रत्येक जण या उपक्रमात सहभागी होऊन बदलाचे साक्षीदार व्हावे,’’ असे आवाहन श्रेया खाडिलकर हिने मंगळवारी केले.

‘सकाळ माध्यम समूह’ने सुरू केलेल्या ‘नकुशी नव्हे; हवीशी’ या मोहिमेतंर्गत सिंहगड रस्त्यावरील ‘एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’तर्फे श्रेया हिच्यासह तिला दत्तक घेणाऱ्या डॉ. श्रीकांत खाडिलकर आणि आई अनुरंजनी खाडिलकर यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका मंजूषा नागपुरे आणि मंडळाचे अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्या हस्ते तिघांना गौरविण्यात आले. मंडळाचे सचिव विजय कोंढरे, सोमनाथ गिरी, सतीश दांडेकर आणि ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सुनील माळी उपस्थित होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून खाडिलकर दांपत्य आणि त्यांनी दत्तक घेतलेल्या श्रेया हिच्याविषयीची बातमी नुकतीच ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती.

श्रेया म्हणाली, ‘‘मुलाला मिळणारे पालनपोषण मुलींनाही मिळाले पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. ती दत्तक झाली तरी काय झाले? आज दत्तक मुलांना अनेक समस्या जाणवतात. त्यासाठी मी काम करत आहे. समुपदेशनातून आणि काही जागृतीपर कार्यक्रमाद्वारे त्यांचे प्रश्‍न सुटतील.’’ 

श्रीकांत खाडिलकर म्हणाले,‘‘सकाळ’चा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे नक्कीच बदल घडेल. महिला-युवतींनी या मोहिमेत सहभाग घ्यावा. आज सिंगल पॅरेंटिंगची चळवळ रुजत असून येत्या काळात नकुशी ही हवीहवीशी होईल, असा विश्‍वास वाटतो.’’

गिरी म्हणाले, ‘‘सकाळ’ची मोहीम तळागाळात पोचली पाहिजे. ज्यातून अधिकाधिक प्रमाणात लोकांमध्ये जागृती होईल. त्यात मंडळांचाही सहभाग असायला हवा. ‘सकाळ’ची ही मोहीम बदल घडवेल.’’

‘सकाळ’ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवीत आले असून ‘नकुशी नव्हे; हवीशी’ या मोहिमेतून समाजात नक्कीच बदल घडेल. पालिका आणि सामाजिक संस्थांद्वारे ‘मुलगी वाचवा’वर अनेक मोहिमा राबविल्या जातात; पण अजूनही वस्ती पातळीवर आणि मध्यम वर्गीयांमध्ये त्याबाबत जागृती झालेली नाही. आम्ही त्यासाठी एक गट तयार केला असून, पथनाट्य आणि इतर कार्यक्रमाद्वारे तो वस्त्यांमध्ये जाऊन ‘मुलगी वाचवा’बाबत जागृती करत आहे.
- मंजूषा नागपुरे, नगरसेविका