झोपडपट्टीतील मुली शिक्षणाच्या प्रवाहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

‘आदर फाउंडेशन’तर्फे पुन्हा शिक्षण घेण्याची संधी

पुणे - हलाखीच्या परिस्थितीमुळं आरतीचं शिक्षण थांबलं. तेही सातवीच्या वर्गातच. मग, शाळा सुटल्याने ती घरकाम करेल असं तिच्या आई-वडिलांनी ठरवलं. तसं आरती घरकामं करू लागली. आठवीमधील रोहिणीला लग्न करायचं म्हणून शिक्षण थांबवावं लागलं. घरातल्या मंडळीचा आग्रह म्हणून तिने नाइलाजास्तव लग्नाला होकार दिला; पण, आरती आणि रोहिणीला शिकायचं होतं. त्यांना ही शिकण्याची संधी ‘आदर फाउंडेशन’तर्फे मिळाली आहे. 

इच्छा असूनही शिक्षण घेता येत नसलेल्या मुलींसाठी फाऊंडेशनने ‘शिक्षण तुमच्यासाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात ६० मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. 

झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि रोज छोटी-मोठी कामे करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील मुलींना शिक्षणापासून लांब राहावे लागत असल्याचे फाउंडेशनच्या निदर्शनास आले. त्यानंतर अशा मुलींच्या पालकांना भेटून मुलींचे शिक्षण थांबविण्याची कारणे जाणून घेण्यात आली. त्याला घरची बेताची आर्थिक स्थिती हेच मुख्य कारण असल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर आले. ही बाब हेरून गेल्या आठ वर्षांपासून अशा मुलींना मदत करण्यासाठी ‘शिक्षण तुमच्यासाठी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या मुलींच्या शिक्षणानंतर म्हणजे, लग्नासाठी छोटी-मोठी मदत करण्याच्या उद्देशाने ‘माधुरी अभय कन्या’ योजना सुरू करण्यात आली आहे.

फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल माने म्हणाले, ‘‘शिक्षण सोडून काही मुली धुणी-भांडीची कामे करीत असल्याचे दिसून आले. केवळ घरातील आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्ता असूनही त्यांना शिक्षण सोडावे लागले होते. अशा मुलींना त्या त्या भागातील शाळांमध्ये पुन्हा प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांचे शैक्षणिक शुल्क आणि शालेय साहित्य देण्याची सोय केली जाते.’’

महाविद्यालयीन मुलींनाही मदतीचा हात 
या उपक्रमातर्गंत शालेय शिक्षण पूर्ण झालेल्या मुलींना महाविद्यालयीन शिक्षणासाठीही मदत केली जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून महाविद्यालयीन मुलींना मदतीचा हात देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न असेल, असे फाउंडेशनच्या समन्वयक आणि नगरसेविका दिशा माने यांनी सांगितले.