लैंगिक अत्याचार करून अडीच वर्षांच्या मुलीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

श्रुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शेजारी आणि नातेवाइकांची चौकशी करण्यात आली. मात्र अद्याप आरोपी निष्पन्न झालेला नाही. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
- शिवाजी पवार, सहायक आयुक्त

पुणे - आई-वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून तिचा निर्दयी खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 22) सकाळी वडगाव खुर्द येथे उघडकीस आली. तिचा मृतदेह घराशेजारील मोकळ्या जागेत आढळला. श्रुती विजय शिवनगे असे या मृत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील विजय शिवनगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विजय शिवनगे व त्यांची पत्नी विद्या हे मूळचे लातूर जिल्ह्यातील (वांजरवाडा, ता. जळकोट) येथील रहिवासी आहेत. ते रोजगारासाठी पुण्यात आले असून, विजय शिवनगे हे धायरी येथे भाजीपाला पॅकिंगचे काम करतात. ते काम संपल्यानंतर ते येथील एका हॉटेलमध्ये वेटरचेही काम करतात. ते धायरी येथील "क्रॉस ओव्हर काउंटी' इमारतीमागे लगडमळा येथे एका इमारतीत तळमजल्यावर भाड्याने राहतात. दोन महिन्यांपूर्वीच ते येथे राहण्यास आले होते. त्यांना श्रुती ही अडीच वर्षांची मुलगी आहे. शनिवारी भाऊबिजेची सुटी असल्याने ते घरीच होते. त्या दिवशी नऊच्या सुमारास श्रुती झोपली. त्यानंतर काही वेळाने अकराच्या सुमारास सगळे झोपले. पावणेबाराच्या सुमारास त्यांची पत्नी विद्या हिला जाग आली तेव्हा त्यांच्याजवळ श्रुती झोपलेली नव्हती. त्यांनी घाबरून पती विजयला उठविले. या वेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले.

विद्या आणि विजय दोघांनी श्रुतीचा शोध घेतला. बराच वेळ ती न सापडल्याने विद्या यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेबाबत कळविले. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास श्रुतीचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास नागरिकांना घरापासून काही अंतरावरील "प्रयेजा सिटी'च्या मागे मोकळ्या जागेत श्रुतीचा मृतदेह आढळला.