ज्येष्ठांसाठीही ‘स्मार्ट’ सुविधा हव्यात - डॉ. माशेलकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘‘देशात शंभर ‘स्मार्ट सिटी’ उभारण्यात येत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने सोयी-सुविधा निर्माण झाल्या तरच खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ म्हणता येईल,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राचे (इंटरनॅशनल लाँजेटिव्हिटी सेंटर- इंडिया) अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, केंद्राचे अध्यक्ष जयंत उमराणीकर, भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे प्र-कुलपती डॉ. प्रा. शिवाजीराव कदम आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती आदी उपस्थित होते. 

टिळक यांच्या हस्ते कांचन बुटाला (वय ७५),विनता गर्दे (वय ७८) आणि शंकरराव जगदाळे (वय ९६) यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विश्रांतवाडी ज्येष्ठ नागरिक संघ, मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूर आणि सिनिअर सिटिझन्स क्‍लब ठाणे नॉर्थ या संघांचाही सन्मान केला.

उमराणीकर म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांचे सबलीकरण हा आपल्यासमोर असलेला मोठा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे वाटते.’’

यशोदा काशीकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. केंद्राच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडियासह युवाशक्तीचाही वापर करून घेण्यास शिकले पाहिजे. इतरांचे आणि स्वतःचे वागणे सुसह्य करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र