सोशल मीडियाद्वारे वस्तूंचे "ब्रॅंडिंग' 

रीना महामुनी-पतंगे
शुक्रवार, 23 जून 2017

सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉपिंगचे फायदे 
- वस्तूंची सगळ्या बाबतीत तुलना करणे शक्‍य. 
- खरेदीनंतर पैसे देण्यासाठी विविध पर्याय. 
- पेट्रोल, पार्किंगचा खर्च वाचतो. 
- खरेदीसाठी वेळेचे बंधन नाही. 
- खरेदीनंतर प्रतिक्रिया देण्याची व्यवस्था. 

पुणे - व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, जागेबरोबरच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात; पण जागा-भांडवलात फारशी गुंतवणूक न करताच आपण उत्पादित केलेल्या वस्तूंना मागणी मिळाली तर? हे शक्‍य झाले आहे खासगी कंपन्यांच्या साईट्‌सच्या पाठोपाठ आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या महिलांमुळे. 

फेसबुक पेज, व्हॉट्‌सऍप ग्रुप, तसेच विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून छायाचित्रे रोज अनेकांना पाठविली जातात. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला आपल्या उत्पादनांना हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचवत आहेत. अशा प्रकारे घरबसल्या विविध वस्तूंची माहिती मिळत असल्यामुळे महिला-तरुणी या पेजेसला फॉलो करत आहेत. व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून उत्पादनांना सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न महिला करत आहेत. लाइव्ह चॅटद्वारे खरेदीदारांच्या शंकांचे निरसनही केले जाते. 

महिलांनी सोशल मीडियाचा वापर करून ज्वेलरी, कपडे, बॅग्ज, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आहे. हा ट्रेंड वाढला असून, आता ऑनलाइन शॉपिंगसह ऑनलाइन व्यवसायाकडे महिला-तरुणींचा कल वाढला आहे. आवडीचे रंग, प्रकार आणि भरघोस सूट या वैशिष्ट्यांमुळे महिला या खरेदीकडे आकर्षित होत आहेत. विविध ठिकाणच्या साड्या, ज्वेलरी, कपड्याची डिझाईन, पादत्राणे असे नवनवीन वस्तूचे फोटो रोज फेसबुकवर शेअर करतात. त्यात रंग, पॅटर्न, कपड्याचे सूत अशा विविध गोष्टींची माहिती देतात. 

मला बाहेर पडून नोकरी करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे घरातील जबाबदारी सांभाळत सोशल मीडियाच्या माध्यमातून "ऑनलाइन शॉपिंग'चे पेज व संकेतस्थळ सुरू केले. त्या माध्यमातून पैठणी, कुर्तीज, साडी विकली जाते. त्याला महिला व तरुणींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच ज्वेलरीचेही पेज सुरू करणार आहे. 
- उज्ज्वला किरदत-पाटील, उद्योजिका 
 

मला साडी, ज्वेलरी खरेदीची खूप आवड आहे. त्यामुळे मी फेसबुक पेज आणि वेगवेगळ्या साइट्‌स नेहमीच सर्च करते. शॉपिंगबाबत माहिती जाणून घेण्याचे हे नवे माध्यम खूपच प्रभावी आहे. विविध साड्यांच्या डिझाइन्स, ज्वेलरी या माध्यमातून जाणून घेता येतात. यातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आनंद वाटतो. 
- अनिता बंडगर, फॉलोअर महिला