सोशल मीडियावरून नोकरी शोधताय! जरा जपून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नोकऱ्यांच्या जाहिरातींचा भडिमार; खासगी वेब पोर्टल मात्र विश्‍वासार्ह

नोकऱ्यांच्या जाहिरातींचा भडिमार; खासगी वेब पोर्टल मात्र विश्‍वासार्ह
पुणे - सोशल मीडियावर विविध सरकारी, खासगी, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील भरती, गलेलठ्ठ पगारांच्या जाहिरातींचा सध्या जोरदार भडिमार सुरू आहे. व्हॉट्‌सऍप, फेसबुकवरील नोकरीच्या जाहिरातींबद्दल साशंकता असली तरी खासगी वेब पोर्टल मात्र विश्‍वासार्ह असल्याचा अनुभव तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला.

सोशल मीडियामुळे जगाच्या कुठल्याही भागात काहीही घडले की, काही मिनिटांतच हातातील मोबाईलवर अक्षरांच्या किंवा ध्वनिचित्रफितींच्या स्वरूपात माहिती येऊन धडकते. मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आले असून, फोर जी इंटरनेट सुविधेमुळे "ग्लोबल व्हिलेज' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. मात्र, मोबाईलद्वारे प्रसारित होणारी सर्वच माहिती खरी असते का, त्याची विश्‍वासार्हता काय, अप्रत्यक्षरीत्या ऑनलाइन फसवणूक करणारी तर नाही ना याची खात्री करून घेतली पाहिजे. सध्या व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ई-मेलद्वारे विविध सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, नामांकित कंपन्या, बॅंका, सैन्यभरती, खासगी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकऱ्यांच्या भरती, पदे आणि पगारांच्या आकड्यांसह शैक्षणिक पात्रतेची आकर्षक माहिती येते. "फॉर्वर्ड' संस्कृतीमुळे जाहिरातींच्या सत्यतेची शहानिशा न करता आपणही नकळत मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांना अशी माहिती "फॉर्वर्ड' करतो.

या संदर्भात विवेक चव्हाण "सकाळ'शी बोलताना म्हणाला, 'मी डिप्लोमा इंजिनिअरिंग केले आहे. सध्या नोकरी शोधतोय. सोशल मीडियाद्वारे आलेल्या जाहिरातीवरील क्रमांकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 80 टक्के जाहिराती खोट्या निघाल्या. मात्र, खास नोकरीसाठी असलेल्या "पेड आणि फ्री वेब पोर्टल'वरील नोकरीच्या जाहिराती खऱ्या असल्याचे आढळले. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांनी अशा "व्हायरल' जाहिरातींची शहानिशा करावी.''

प्रियांका कुलकर्णी म्हणाली, 'बहुतांशी "व्हायरल' जाहिराती खोट्या असतात; परंतु वेब पोर्टलद्वारे मिळणारी माहिती शंभर टक्के खरी असते. नोकरी आणि पॅकेजच्या आशेने काहींची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना मी पाहिल्या आहेत. त्यामुळे नोकरी शोधताना सत्यता पडताळून पावले उचलायला हवीत.''

'सध्या सोशल मीडिया हा माहितीचा स्रोत बनला आहे. त्यामुळे मोबाईलवर येणारी प्रत्येक माहितीची सत्यता पडताळणी करून घेतली पाहिजे. आकर्षक पगारांच्या जाहिराती व्हॉट्‌सऍपवर व्हायरल होतात; परंतु त्या खोट्या निघतात. इंटरनेटवर नोकरीसाठी स्वतंत्र वेब पोर्टल "पेड आणि फ्री' कंपन्यांच्या जाहिराती खऱ्या असतात. त्यातून नोकऱ्या मिळतात. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांनी ऑनलाइन नोकरी शोधताना काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.''
- दुर्गेश मंगेशकर, करिअर समुपदेशक