सुंदरता व्यक्तिमत्त्वातच - सोनाली कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘‘एकीकडे गोरा रंग म्हणजेच सुंदरता आणि दुसरीकडे सुंदर मुली हुशार नसतात, असे म्हटले जाते. या गैरसमजुती आपल्याकडे फार पूर्वीपासून आहेत, त्या दूर व्हायला हव्यात. खरंतर सुंदरता ही केवळ चेहऱ्यावर किंवा रंगावर नसते, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात असते,’’ असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्‍त केले.

पुणे - ‘‘एकीकडे गोरा रंग म्हणजेच सुंदरता आणि दुसरीकडे सुंदर मुली हुशार नसतात, असे म्हटले जाते. या गैरसमजुती आपल्याकडे फार पूर्वीपासून आहेत, त्या दूर व्हायला हव्यात. खरंतर सुंदरता ही केवळ चेहऱ्यावर किंवा रंगावर नसते, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात असते,’’ असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्‍त केले.

जागतिक कन्या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’, ‘प्रीमियर’ या दिवाळी अंकांचे प्रकाशन वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटविलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, बांधकाम व्यावसायिक दर्शना परमार, डॉ. जाई केळकर, जागतिक शिक्षणाच्या राजदूत दीक्षा दिंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, ‘तनिष्का’च्या सहसंपादक मंजिरी फडणीस, ‘प्रीमियर’चे संपादन समन्वयक संतोष भिंगार्डे  उपस्थित होते.

सोनाली म्हणाली, ‘‘सौंदर्य हे दाखविण्याची गरज नसते, ते आपोआप व्यक्तिमत्त्वातून दिसत राहते. तुम्ही बोलता कसे, लोकांसमोर येता कसे, तुमचे हावभाव कसे आहेत, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे... अशा अनेक गोष्टींतून ते दिसते आणि ते त्याच पद्धतीने दिसले पाहिजे. रंगातून नव्हे. देखणेपणा म्हणजेच सुंदरता, असे मानणाऱ्यांच्या मी विरोधात आहे.’’

चित्रपटसृष्टीतील दहा वर्षांची वाटचालही तिने उलगडली. ज्या वेळी मी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, त्या वेळी अक्षरशः कोऱ्या पाटीप्रमाणे होते; पण वेगवेगळ्या प्रगल्भ कलावंतांसोबत काम करत अभिनय, नृत्य शिकत गेले. या क्षेत्रात टिकून राहणे खूप अवघड आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट उत्तम करू शकता, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा; तरच कोठेही टिकून राहू शकता, हे मला माहिती आहे, असेही तिने सांगितले.

शहरातील प्रश्‍नांपासून गावपातळीपर्यंतचे वेगवेगळे प्रश्‍न सोडविण्यात ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ची महत्त्वाची भूमिका आहे. खरंतर ‘तनिष्का’ ही चळवळच बनली आहे.
- मोनिका सिंग 

बांधकाम क्षेत्रात महिलांचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे. या क्षेत्रात संधी आहेत, त्यामुळे महिलांनी या क्षेत्रात आले पाहिजे. महिलांच्या कार्यकुशलतेबाबत समाजाचा ‘माइंडसेट’ बदलायला हवा.
- दर्शना परमार 

आजच्या काळातही स्त्री-पुरुष असा भेदभाव होतो. स्त्रियांवर दडपण आणले जाते, हे चित्र बदलायला हवे. स्त्रियांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला तर त्या पुरुषांपेक्षा कमी नाहीत.
- डॉ. जाई केळकर

पाककृतीच्या पुढे जाऊन महिलांना आवश्‍यक ती माहिती ‘तनिष्का’ अंकांमधून दिली जात आहे. त्यामुळे महिलांमध्ये वाचनाची गोडी तर वाढत आहेच. शिवाय, महिलांचे विचारही बदलत आहेत.
- दीक्षा दिंडे

Web Title: pune news sonali kulkarni