सोनोग्राफी मशिन खरेदीतील गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - महापालिकेचे दवाखाने आणि हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशिन्सच्या खरेदीत गैरव्यवहार झाला असून, त्याच्या चौकशीचा आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

महापालिकेचे दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशिन्स बसविण्यात आली आहेत. त्यासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, या मशिन्सचा फारसा वापर होत नाही. सन 2015-16 मध्ये केवळ 20 आणि 2016-17 या वर्षात 30 जणांची तपासणी झाली आहे. त्यातच, बाजारात एका मशिनची किंमत 13 लाख रुपये असताना महापालिकेने मात्र, ती 23 लाख 85 हजार रुपयांनी खरेदी केली आहे. तर, 32 लाखाची मशिन तब्बल 59 लाख 45 हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. त्यामुळे या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी केली पाहिजे. त्याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अतिरिक्त आयुक्‍तांना चौकशीचे आदेश दिले होते; परंतु त्यानुसार चौकशी झालेली नाही, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.