दक्षिण कोकणात मुसळधारेची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात पाऊस पडेल, असेही खात्याने सांगितले.

पुणे - दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात पाऊस पडेल, असेही खात्याने सांगितले.

मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणातील बहुतांश ठिकाणी व घाटमाथ्यावर शुक्रवारी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील मावळ, मुळशी, पुणे, महाबळेश्‍वर, इगतपुरी, अकोलेच्या काही भागांत हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते.

तर काही ठिकाणी कडक ऊन पडले. त्यामुळे हवामानात दमटपणा वाढून कमाल तापमानात वाढ झाली होती.

अरबी समुद्र ते केरळ या दरम्यान पावसासाठी पोषक चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती कोकणाकडे सरकत आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला; तर कोकणातील बहुतांशी ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. कोकणातील चिपळूण, कर्जत, माणगाव, मुरूड, रोहा येथे पाऊस पडला. हर्णे, लांजा, डुंगरवाडी, ताम्हिणी, भिरा, शिरगाव, कोयना या घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर, हरसूल, सुरगाणा, अक्कलकुवा, भडगाव यासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते; तर काही ठिकाणी ऊन पडले होते.