संपाचा तिसऱ्या दिवशीही फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पुणे - विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तिसऱ्या दिवशीही प्रवाशांना फटका बसला. अाज पासून (शुक्रवार) शासकीय सुट्या सुरू होत असल्यामुळे गावी निघालेल्या अनेकांना बस मिळविण्यासाठी धडपड, प्रवास भाडे कमी करण्यासाठी घालावी लागणारी हुज्जत आणि त्यातूनही बस मिळाल्यानंतर दाटीवाटीने करावा लागणार प्रवास, असे चित्र आजही तिन्ही बस स्थानकांवर कायम होते.

अाज शुक्रवारी पाडवा आणि त्यानंतर शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या आल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दोन दिवसांच्या संपामुळे आज अनेक जण घरातून निघण्यापूर्वी संप मिटला आहे की नाही, याची खात्री करून घेत होते. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेने काल  कमी होती. मात्र, वाहतुकीसाठी अपुरी साधने असल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊन त्यांना नाइलाजास्तव खासगी वाहतूकदारांकडे जावे लागत आहे. प्रवाशांच्या गरजेचा फायदा उठविणे खासगी वाहतूकदारांकडून आजही सुरूच होते.

स्वारगेट किंवा शिवाजीनगर येथील आगारांमध्ये एसटीच्या बंद बस उभ्या केलेल्या आहेत. त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बसला एसटी स्टॅंडमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने वाहने स्टॅंडमध्ये येत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. स्वारगेट स्टॅंडमध्ये गुरुवारी कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. स्टॅंडमध्ये दाखल झालेली खासगी बस बाहेर काढताना कसरत करावी लागत होती. येत्या दोन दिवसांत संप मागे न घेतला गेल्यास शनिवार आणि रविवारीदेखील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. तसेच, संप न मिटल्यास गावी गेलेल्या लोकांना परतीच्या प्रवासासाठी साधने कशी उपलब्ध होणार, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहेत.

भोरमध्ये एसटी धावली
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत असल्याचे पाहून शिवसेनाप्रणीत एसटी कामगार संघटनेने गुरुवारी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील भोर एसटी आगारातून गुरुवारी सकाळी आठ बस सोडण्यात आल्या. या बसद्वारे तालुक्‍यातील महुडे, वरवडी, दुर्गाडी, पळसोशी, वीसगाव खोरे, रायरी, मांढरदेवी आदी ठिकाणी पंचवीस फेऱ्या करण्यात आल्या. सेवा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Web Title: pune news st bus strike