विसर्जन मिरवणुकीत पथदिवे बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

गणपती चौकापासून शेडगे विठोबा चौकापर्यंतची परिस्थिती

पुणे - अनंत चतुर्दशीला गणपती चौकापासून शेडगे विठोबा चौकापर्यंतचे पथदिवे बंद होते. परिणामी, जनरेटरच्या प्रकाशात वाट काढत गणेश मंडळांना पुढे जावे लागले. रस्त्याच्या दुतर्फा ये-जा करणाऱ्या नागरिकांना चेंगराचेंगरीला तोंड द्यावे लागले. यात लहान मुलांचेही हाल झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तर घडल्या प्रकाराबाबत उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकल्याने संतप्त झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनीही महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला.

मानाचे गणपती मार्गस्थ झाल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरून शतकोत्तर रौप्य महोत्सवी मंडळांना पोलिसांनी मार्ग करवून दिला. मात्र, पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातच वाट काढत जावे लागत होते. ढोलताशा वादन करताना अंधारात नागरिकांना काठी लागू नये म्हणून वादक सावधगिरीने वादन करत होते. रात्रीच्यावेळी विद्युत रोषणाईचे देखावे पाहायला आलेल्या नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला. महिला आणि लहानमुलांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले. जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळासहित अन्य मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांनाही पथदिवे बंद असल्याचे सांगण्यात आले; परंतु वेळेत पथदिवे सुरू झालेच नाहीत. उत्सव काळातही अधून-मधून या परिसरातील पथदिवे बंद होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी ठोस उत्तर देणे टाळले. पोलिसांकडून याबाबतची तक्रार आल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल, पैसे चोरण्याचे प्रकार घडतात; परंतु मुख्य विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरील बहुतांश पथदिवे बंद होते. त्यामुळे महिला आणि लहानमुलांची गैरसोय झाली. गर्दीच्या ठिकाणी नेहमी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. ते त्यांनी बजावले नाही. त्यामुळे मंडळातर्फे आम्ही निषेध नोंदवितो. 
- जीवन रणधीर, अध्यक्ष, जिलब्या मारुती मंडळ 

आमच्या मंडळाचा रथ रात्री मुख्य मिरवणुकीत सहभागी झाला; परंतु, अंधारातच वाट काढत जावे लागले. रस्त्यावरचे पथदिवे बंद असल्याचे कार्यकर्त्यांकडून समजले. मिरवणुकीत हजारो नागरिक रस्त्यावर असतात. त्यात महिला, मुलेही असतात. याचे भान ठेवून पथदिवे सुरू ठेवायला पाहिजे होते. परंतु, महापालिकेने दाखविलेल्या अकार्यक्षमतेबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतो. 
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू मंडळ