विद्यार्थ्यांचा कोंडमारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे - राज्याचा शिक्षण विभाग आणि परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली तयार केली आहे. तिचे सध्या रिक्षाचालक आणि व्हॅनचालकांकडून सर्रासपणे उल्लंघन होत आहे; मात्र आरटीओ आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

पुणे - राज्याचा शिक्षण विभाग आणि परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली तयार केली आहे. तिचे सध्या रिक्षाचालक आणि व्हॅनचालकांकडून सर्रासपणे उल्लंघन होत आहे; मात्र आरटीओ आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी दोन्ही विभागांनी एकत्रित येऊन स्वतंत्र ‘शालेय वाहतूक नियमावली’ तयार केली. याअंतर्गत रिक्षा व स्कूल व्हॅनची प्रवासी क्षमता विचारात घेण्यात आली. त्यानुसार दीड पट विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षामध्ये जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची, तर स्कूल व्हॅनमधून चालकासह दहा विद्यार्थ्यांची वाहतूक करणे कायदेशीर आहे; परंतु प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर रिक्षा आणि स्कूल व्हॅनचालकांकडून या नियमावलीचा सर्रासपणे भंग केला जात असल्याचे दिसून आले. रिक्षांमध्ये पाचऐवजी दहापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे. रिक्षेच्या बाहेरील बाजूस त्यांचे दप्तर लटकत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जात असल्याचेही पाहावयास मिळाले. कोंबड्या आणि मेंढ्यांप्रमाणे विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून आले.
 

नियमावलीचा भंग करणाऱ्या रिक्षा आणि स्कूल व्हॅनवर ‘आरटीओ’कडून नियमित कारवाई करण्यात येते. गेल्या महिन्यांत ४५ रिक्षा जप्त करण्यात आल्या. या पुढेही ही कारवाई सुरू राहणार असून, रिक्षा आणि व्हॅनचालकांनी नियमांचे पालन करावे.
- अनिल पंतोजी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी.