तुम्हीही करा ढगांचा अभ्यास!

(शब्दांकन - नीला शर्मा)
शनिवार, 24 जून 2017

कुठल्याही राज्याची प्रगती ही तिथल्या बरकतीवर अवलंबून असते. यासाठी पाऊस कळीची भूमिका बजावतो. कोरड्या किंवा ओल्या दुष्काळाचं संकट टाळून योग्यवेळी, योग्य त्या प्रमाणात होणारा पाऊस म्हणजे सुखाचा स्रोत. बळिराजाचं, पर्यायानं त्यावर अवलंबून असलेल्या जनतेचं सारं काही पावसाच्या हाती असतं. हा पाऊस येतो कसा, याच्या शास्त्रीय कारणांपासून ते शास्त्रीय संगीतात बरसणाऱ्या पावसाचे रूप उलगडणारी मालिका आजपासून...   

पुणे - विमान, जहाज चालकांसाठीही महत्त्वाचा असणाऱ्या ढगांच्या अभ्यासासाठी सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यासाठी हवामान खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून ढगाबद्दलची माहिती दिली जात आहे. ढग, विजा, पर्जन्य व तापमान, वाऱ्याची दिशा याचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी सर्वसामान्यांकडून मिळविणे आणि त्या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांना देणे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

हवामान खात्याने यंदा ‘ढग’ हा विषय सर्वसामान्यांच्या जनजागृतीसाठी जाहीर केलेला आहे. याअंतर्गत मेघांचे स्वरूप, आकार, प्रकार आदींबद्दल माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शिवाजीनगर (सिमला ऑफिस) आणि महाबळेश्‍वर येथील कार्यालयात शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून ढगाबद्दलची सर्वांगीण माहिती रंजकपणे दिली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रकल्पनिर्मितीसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे. अवकाश निरीक्षणाप्रमाणे आकाशनिरीक्षणही किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव याठिकाणी करून दिली जात आहे. केवळ माहिती घेऊन मनोरंजन करणे एवढ्यापुरता हा प्रयोग मर्यादित नसून, यातून उत्कंठा निर्माण व्हावी आणि सातत्याच्या नोंदीमधून नागरिकांनी हवामान खात्याला आणि शास्त्रज्ञांना मदत करावी, असा हेतू आहे. विशेष म्हणजे येथे येणारे विद्यार्थी यामध्ये रस घेत आहेत. प्रांगणात ‘वेधशाळा’ उभारण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयेही पुढाकार घेत आहेत, अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक राजेश माळी आणि हवामान शास्त्रज्ञ पी. एस. बुधकर यांनी दिली.

कसा चालतो अभ्यास?
वातावरणातील जलबाष्पाचं सूक्ष्म जलबिंदू किंवा हिमकणांमध्ये रूपांतर झाल्यावर आकाशात अधांतरी तरंगणारे जल किंवा हिमकणांचे पुंजके म्हणजे ढग. यांच्यात धुळीचे कणही असू शकतात. मेघांचे प्रकार बरेच असले, तरी त्यांच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांवरून ढोबळ मानानं त्यांचं वर्गीकरण केलं जातं. सगळ्याच ढगांमधून पाऊस पडत नाही. हिमवृष्टी, पर्जन्य, गारा पडणं, मंद तुषार बरसणं हे प्रकार विशिष्ट भौतिक किंवा गतीच्या प्रक्रियांमुळे घडून येतात. 

कसा पडतो पाऊस?
उच्च, मध्यम व खालच्या पातळीनुसार ढगांची वर्गवारी केली जाते. मेघांची तीन तऱ्हांची कुलं अभ्यासासाठी मानली जातात. तंतुमेघ, तंतुराशी मेघ, तंतुस्तर मेघ, मध्यराशीमेघ, मध्यस्तरी, वर्षास्तरी, स्तरराशी, स्तरमेघ, राशिमेघ व गर्जन्मेघ असे दहा प्रकार आहेत. अरबी समुद्राकडून किंवा इशान्येकडून वाहणारे वारे सह्याद्री पर्वतरांगांमुळे अडवले गेल्यानं पुण्यात पाऊस पडतो. वातावरणातील अडथळा, उष्णतामान, वाऱ्याची दिशा व गती हे घटक पावसासाठी मोलाची भूमिका बजावतात. आषाढ महिन्यात गर्जन्मेघ, राशिमेघ व स्तरमेघ आढळतात.