आत्महत्येचा विचार नैराश्‍यातूनच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पुणे -  कविताला गेल्या वर्षी दहावीत 80 पेक्षा जास्त टक्के गुण मिळाले. त्यामुळे साहजिकच वडिलांना आनंद झाला. त्यांनी नवा कोरा मोबाईल फोन देण्याचे "प्रॉमिस' निकालाच्या दिवशीच पूर्ण केले. स्मार्ट फोनमुळे वर्षभरात बाहेरच्या आभासी जगाशी कविता जोडली गेली, पण घरातील संवादात मात्र "अडथळा' आला. घरी असताना तिच्या हातात फक्त मोबाईल असायचा. झोपेतून उठल्यानंतर मोबाईल, जेवताना, बोलताना, इतकेच काय पण सिग्नलवर थांबल्यानंतरही तीसपैकी 20 सेकंद ती मोबाईलमध्येच असायची. "मोबाईल ऍडिक्‍शन'वरून तिला कोणी बोललेले आवडत नव्हते. त्यातून ती एकलकोंडी झाली. तिला नैराश्‍य आले.

पुणे -  कविताला गेल्या वर्षी दहावीत 80 पेक्षा जास्त टक्के गुण मिळाले. त्यामुळे साहजिकच वडिलांना आनंद झाला. त्यांनी नवा कोरा मोबाईल फोन देण्याचे "प्रॉमिस' निकालाच्या दिवशीच पूर्ण केले. स्मार्ट फोनमुळे वर्षभरात बाहेरच्या आभासी जगाशी कविता जोडली गेली, पण घरातील संवादात मात्र "अडथळा' आला. घरी असताना तिच्या हातात फक्त मोबाईल असायचा. झोपेतून उठल्यानंतर मोबाईल, जेवताना, बोलताना, इतकेच काय पण सिग्नलवर थांबल्यानंतरही तीसपैकी 20 सेकंद ती मोबाईलमध्येच असायची. "मोबाईल ऍडिक्‍शन'वरून तिला कोणी बोललेले आवडत नव्हते. त्यातून ती एकलकोंडी झाली. तिला नैराश्‍य आले. त्यातूनच तिने एक दिवस सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ते त्रिकोणी कुटुंब अक्षरशः मुळापासून हादरले. 

मुंबईमध्ये किशोरवयीन मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेला अवघे काही दिवसही लोटले नव्हते. इतक्‍यातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येची बातमी येऊन धडकली. त्यामुळे तरुणांच्या मनात चाललेला कोलाहल पुढे येत आहे. त्याबाबत "सकाळ'ने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद साधला. 

स्मार्ट फोनवर असलेल्या व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियातून आभासी जगाशी जोडलेल्या तरुणांसाठी घरातील संवाद मात्र "अडथळा' ठरतो आहे. त्यामुळे एकलकोंडेपणा, नैराश्‍य आणि चिडचिड होऊन आत्महत्येचा टोकाचा विचार केला जात असल्याचे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. स्मिता पानसे म्हणाल्या, ""आधुनिक तंत्रज्ञानाने माणसे जोडली गेली आहेत. पण, समोरासमोर  होणार संवाद कमी झाला आहे. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक बदल होत असतात. त्याचवेळी त्यांच्यात भावनिक गुंता झालेला असतो. हेच वय असते की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू ठळकपणे पुढे येत असतात आणि करियरच्या वाटाही निश्‍चित होत असतात. या वयात आतापर्यंत मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा होत होत्या. घरी आल्यावर कुटुंबातील व्यक्तींशी बोलणे होत असे. पण, आता स्मार्ट फोनमुळे आभासी संवाद वाढला आहे. घर किंवा मित्रांमधील प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. त्यामुळे मनातील गोष्टी मोकळेपणाने बोलण्याची जागा कमी झाली आहे. त्यातून किशोरवयीन मुलांची मानसिकता बदलत असल्याचे दिसते.'' 

मनोविकारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे म्हणाले, ""सोशल मीडियाचे फायदे तसेच तोटेही आहेत. त्यातून मुला-मुलींना "ऍडिक्‍शन' होते. त्यातून आत्महत्येची प्रवृती निर्माण होते. आत्महत्येचा विचार मनात येणे हा एक मानसिक आजार आहे. त्याचे निदान होणे आवश्‍यक आहे. याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियावर बंदी आणा. पण, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे.'' 

ताणतणाव हा प्रत्येकाला असतो. त्याचे व्यवस्थापन करण्याचे धडे किशोरवयापासून गिरविले पाहिजेत, तरच आत्महत्येच्या विचारांपासून मुलांना दूर ठेवता येईल. याबाबत येत्या गुरुवारी (ता. 27) दुपारी तीन वाजता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनोविकारशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मनजित संत्रे हे "सकाळ फेसबुक लाइव्ह'मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. पालकांसह विद्यार्थ्यांनाही या "ऑनलाइन' चर्चेत सहभागी होता येईल.