परिपूर्ण ‘जीएसटी’ आणण्यासाठी आम्ही ‘सुपर-ह्यूमन’ नाही - प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘‘परिपूर्ण वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणण्यासाठी आम्ही काही ‘सुपर-ह्यूमन’ नाही. ‘सरकारने सर्व बाबींचा विचार केला नाही’ अशी टीका करणाऱ्या लोकांनी गेली सत्तर वर्षे देशातील सत्ता ‘सुपर-ह्यूमन्स’ प्रमाणे राबविली असती, तर आज आपल्यासमोर इतक्‍या अडचणी राहिल्या नसत्या,’’ अशी टीका केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू यांनी काँग्रेस पक्षावर केली. 

‘कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’तर्फे (सीआयआय) पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रभू यांनी विविध क्षेत्रांतील उद्योजकांशी संवाद साधला. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी या वेळी दिली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली.

‘जीएसटी’ विषयी बोलताना प्रभू म्हणाले, ‘‘जुन्या प्राप्तिकर कायद्याचे रूपांतर स्वातंत्र्यानंतर १९६१मध्ये नव्या कायद्यात झाले. त्यानंतरही त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा बहुतांश सकारात्मक होत्या. साठ वर्षांहून जुन्या कायद्यामध्ये इतक्‍या सुधारणा कराव्या लागल्या, कारण तुम्ही एका ‘परफेक्‍ट’ कायद्याचा विचार नाही करू शकला. या तुलनेत जीएसटी किती जुना आहे? तर सहा महिनेसुद्धा पूर्ण झालेले नाहीत. हा कायदा अजून विकसित होत आहे.’’ 

जीएसटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सरकारचा प्रतिसादही तितकाच सकारात्मक आहे. काही लोक टीका करतात की तुम्ही सर्व गोष्टींचा विचार केला नाही.. पण फक्त ‘सुपर-ह्यूमन’च असा विचार करू शकतात. जर अशा लोकांनी गेली साठ वर्षे देशातील सत्ता ‘सुपर-ह्यूमन्स’प्रमाणे राबविली असती, तर आज आपल्यासमोर इतक्‍या अडचणी नसत्या, असेही त्यांनी सांगितले.