मूत्रपिंडावर रोबोकडून दुर्मिळ शस्त्रक्रिया

मूत्रपिंडावर रोबोकडून दुर्मिळ शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिया म्हटले की शरीरावर मोठा छेद घ्यायचा. रुग्णाने अनेक दिवस खाटेवर पडून राहायचे. या शस्त्रक्रियेच्या पारंपरिक पद्धतीला दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपिक सर्जरी) हा ठोस पर्याय म्हणून पुढे आला. प्रगत वैद्यकशास्त्राने आता या पुढेही जाऊन एक पाऊल टाकत यंत्रमानवाच्या मदतीने (रोबोटिक सर्जरी) शस्त्रक्रिया करण्यात यश मिळविले आहे. ‘रोबोटिक सर्जरी’चा देशातील पहिला यशस्वी प्रयोग पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये झाला असून, त्यातून मूत्रपिंडाच्या दुर्मिळातील दुर्मिळ जंतुसंसर्गावर शस्त्रक्रिया येथील शल्यचिकित्सकांनी केली आहे. 
 

आंध्र प्रदेशात माहिती तंत्रज्ञान कंपनीतील ३७ वर्षीय तरुणाला नक्की कोणता आजार झाला आहे, याचे निदान होत नव्हते. गेल्या चार वर्षांपासून त्याच्या कुशीत वेदना होत होत्या. रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये सोनोग्राफी आणि सीटीस्कॅन अशा रोगनिदान चाचण्या करण्यात आल्या. त्याच्या उजव्या मूत्रपिंडात जवळपास तेवढ्याच आकाराचे जलपुटी गळू (हायडॅटिड सिस्ट) तयार झाले होते. सर्वसामान्य कुत्र्यांमध्ये आढळणाऱ्या जंतांचा संसर्ग झाल्याने मूत्रपिंडाला संसर्ग झाला होता. या जंतांचा संसर्ग सामान्यतः माणसांना होत नाही. तो झालाच तर यकृतामध्ये होतो. तेथून पुढे तो फुफ्फुसात होण्याची शक्‍यता असते; पण मूत्रपिंडात संसर्ग होऊन तेथे ‘सिस्ट’ निर्माण होणे ही दुर्मिळ घटना आहे. अशा प्रकाराचे रुग्ण साधारणपणे ०.२ टक्के दिसून येतात. या रुग्णावर ‘रीनल हायडॅटिड सिस्ट’ची देशातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. रुबी हॉल क्‍लिनिकचे मूत्रविकार विभागाचे प्रमुख आणि रोबोटिक सर्जन डॉ. राजेंद्र शिंपी यांनी ही शस्त्रक्रिया केली. 

दुर्मिळ जंतुसंसर्ग काय आहे?
जलपुटी गळू हा अगदी दुर्मिळ रोग असून, त्याला इचिनोकॉकस ग्रॅन्युलोसस या जंत कारणीभूत ठरतात. हा रोग पश्‍चिम आशिया, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अलास्का; तसेच वायव्य चीन व भारतातील पशुपालक भागात आढळतो. तो सामान्यतः यकृत व फुप्फुसात दिसून येतो व जगभरच्या मनुष्यांतील सर्व प्रकारच्या जलपुटी रोगांत त्याचे प्रमाण एक ते पाच टक्‍क्‍यांपर्यंत आहे.

शस्त्रक्रियेतील आव्हाने
जंतांच्या संसर्गामुळे मूत्रपिंडाचा आकार सामान्यांच्या तुलनेत तीन पटींनी वाढलेला होता. मूत्रपिंडावर तीन चतुर्थांश भागावर हे सिस्ट होते. त्यामुळे जंतुसंसर्ग झालेला मूत्रपिंडाचा भाग काढण्याबरोबरच उर्वरित मूत्रपिंड वाचविण्यावर शल्यचिकित्सकांनी भर दिला होता. त्यामुळे शस्त्रक्रियेतील आव्हान वाढले होते; तसेच शस्त्रक्रियेत सिस्ट फुटून त्यातील विषारी द्रव पोटात पसरण्याचा धोका होता. 

अशी झाली शस्त्रक्रिया
रोबोच्या साह्याने केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे सिस्टमधील द्रव पोटात पसरणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली. नंतर सिस्टमध्ये ‘स्कॉलिसायडल फ्लुईड’ टोचण्यात आले. हे सिस्ट काळजीपूर्वक मूत्रपिंडासह कापण्यात आले. या शस्त्रक्रियेला दोन तास लागले. ही शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सक एका जागी बसून हातातील ‘जॉय स्टिक’चा वापर करून रोबोटिक शस्त्रक्रिया करतात. 

रोबोच्या माध्यमातून मूत्रपिंडावर जंतांच्या संसर्गाने झालेले सिस्ट काढण्याची देशातील पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. मानवी शरीरातील ही दुर्मिळ जंतुसंसर्ग होते. त्यामुळे जगभरातील ही दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. रोबोच्या मदतीने ही शस्त्रक्रिया केल्याने उर्वरित मूत्रपिंड वाचविणे शक्‍य झाले; तसेच शस्त्रक्रियेतील अचूकता आणि गुंतागुंत टाळण्यात यश आले आहे.
- डॉ. राजेंद्र शिंपी, रोबोटिक सर्जन, रुबी हॉल क्‍लिनिक

रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी मोठी गुंतवणूक असते; पण राहुल बजाज आणि मधुर बजाज यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करणे शक्‍य झाले.
- डॉ. पी. के. ग्रॅंट, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, रुबी हॉल क्‍लिनिक

रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे
अत्यल्प रक्तस्राव होतो. या शस्त्रक्रियेत शंभर मिली लिटरपेक्षा कमी रक्तस्राव झाला.  

शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सकांना अवयवांची प्रतिमा स्पष्ट आणि मोठी दिसते.

अचूक शस्त्रक्रिया करता येते. 

मानवी हात वळण्यास मर्यादा असतात, त्या रोबोला नसतात. त्यामुळे अधिक परिणामकारक शस्त्रक्रिया होते.

शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवसांमध्ये रुग्ण खडखडीत बरा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com