अनधिकृत बांधकामांचे होणार सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असली तरी, शहरात किती अनधिकृत बांधकामे आहेत, हे तपासण्यासाठी महापालिका मिळकतकर विभागाच्या सर्वेक्षणाचा आधार घेणार आहे. त्यानंतर बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले. 

पुणे - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असली तरी, शहरात किती अनधिकृत बांधकामे आहेत, हे तपासण्यासाठी महापालिका मिळकतकर विभागाच्या सर्वेक्षणाचा आधार घेणार आहे. त्यानंतर बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले. 

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची नियमावली राज्य सरकारने शनिवारी (ता. 7) जाहीर केली. महापालिकेने यासाठीची प्रक्रिया सहा महिन्यांत सुरू करावी, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. त्यानुसार या बाबतचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. बांधकामे नियमित करण्याचा अर्ज तयार करावा लागेल. त्यानंतर त्याला मंजुरी घेऊन नागरिकांना "जाहीर प्रकटना'द्वारे आवाहन करण्यात येईल. बांधकामे नियमित करण्यासाठी स्वतंत्र "सेल' स्थापन करता येईल का, याचाही आढावा घ्यावा लागेल, असे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी स्पष्ट केले. बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेमुळे पालिकेच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

कोणतेही बांधकाम नियमित करण्यासाठी शुल्क किती असेल, आदींबाबत राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासकीय आदेशाची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच नागरिकांना काही माहिती हवी असल्यास ती देखील उपलब्ध करून देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. बांधकामे नियमित कशी होणार, हेही लवकरच जाहीर करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

अनधिकृत बांधकामे नेमकी किती ? 
शहरात नेमकी अनधिकृत बांधकामे किती आहेत, याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. मिळकतकर विभागाकडून मिळकतींचे, त्यातील बांधकामाचे सर्वेक्षण सुरू आहे. सुमारे चार महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर बांधकाम विभागाकडून प्रक्रिया सुरू होणार आहे. अनधिकृत सूत्रांच्या अंदाजानुसार शहरात किमान 80 हजारांहून अधिक बांधकामे आहेत. महापालिकेने 2001 ते 05 दरम्यान गुंठेवारीमध्ये सुमारे 80 हजार बांधकामे नियमित केली होती. 

गावांमधील अनधिकृत बांधकामांचे काय ? 
महापालिका हद्दीत 11 गावांचा समावेश नुकताच झाला. महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्‍यता दोन वर्षांपासून व्यक्त होत असल्यामुळे या गावांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ही बांधकामेही आता नियमित करण्यासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याबाबतही सखोल चर्चा करून धोरण ठरविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.