आवक वाढल्याने रताळ्याच्या भावात घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - कार्तिकी एकादशीच्या उपवासाकरिता मार्केट यार्ड येथील बाजारात रताळ्याची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आवक झाल्याने भावात थोडी घट झाली आहे. कर्नाटकातील रताळ्यास प्रतिकिलो १० ते १२ रुपये आणि स्थानिक रताळ्यास प्रतिकिलो १२ ते १५ रुपये इतका भाव मिळत आहे.

शिवरात्र, आषाढी एकादशी, नवरात्र, कार्तिकी एकादशी, गोकुळाष्टमी अशा उपवासाच्या कालावधीत रताळ्याची आवक होत असते. चतुर्थीच्या कालावधीत होणारी आवक तुलनेत कमी असते. कार्तिकी एकादशी मंगळवारी (ता. ३१) येत असून, त्या दिवशी वाढणारी मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी दोन दिवसआधी घाऊक बाजारात रताळे विक्रीस पाठविले आहेत. प्रामुख्याने कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, कराड भागातून रताळ्याची अनुक्रमे १०० ते १२० गोणी आणि दीड हजार गोणी इतकी आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक दुप्पट आहे. आवक चांगली झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी भाव प्रतिकिलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी कमी आहेत. 

कर्नाटकातून बाजारात येणारे रताळे हे आकाराने मोठे असते, त्याचा रंग फिका असतो, तर कराड, मलकापूर, कोल्हापूर भागातील रताळे आकाराने लहान आणि गडद रंगाच्या सालीचे असते. कर्नाटकापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्रातील रताळे चवीला अधिक गोड असते. त्यामुळे त्याला मागणी अधिक असते.