बत्ती गुल! दोन महिन्यांचे वीजबिल ४२,६७०!

रामदास वाडेकर
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

महावितरण अंदाजे वीजबिल करीत आहे काय?

टाकवे बुद्रुक : महावितरणचा सावळा गोंधळ नागरिकांना नवा नाही, कितीही तक्रारी केल्या तरी महावितरणने कारभारात सुधारणा करायचीच नाही, असा अलिखित नियमच करून ठेवला की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. डाहुलीतील गबाजी महादू पिंगळे यांना दोन महिन्यांचे वीजबिल तब्बल ४२६७० रुपये आले आहे. पंधरा दिवस वीज गायब असून इतका बिल कसा हा प्रश्न पिंगळेना चक्रावून सोडणारा आहे.

या महिन्याचा बिल पिंगळे यांच्या हातात दोन दिवसापूर्वी पडला, त्यावर चालू रिडिंग ५५६८, मागील रिडिंग २४०३, एकूण वीजेचा वापर ३१६५ युनिट असा मजकूर छापून आला असून बिलापोटी ४२६७० रूपयांची मागणी केली आहे. वास्तविक पिंगळे यांचे आजचे रिडिंग २५८७ इतके आहे. मग महावितरणला या महिन्याचे रिडिंग ५५६८ कसे कळाले? महावितरण अंदाजे वीजबिल करीत आहे काय, असा आक्षेप पिंगळे यांनी घेतला आहे.  

महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारले तेव्हा, तेथील कर्मचारीनी उद्या तुमच्या मीटरचे रिडिंग आणा किंवा वायरमनचा रिपोर्ट आणा अशी मागणी केली. म्हणजे वीजबिल बाबत चौकशी करायला आणि ते पूर्ण करण्यासाठी चार दिवस महावितरणच्या कार्यालयात विनाकारण हेलपाटे मारायचे, शिवाय आर्थिक भुर्दंड वेगळाच, त्यामुळे वीज ग्राहकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  

Web Title: pune news takve budruk mahavitaran shocking electricity bill