कालच्यापेक्षा आज चांगला माणूस आहे का?

नागनाथ शिंगाडे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): जीवन जगताना स्वतःवर, आजूबाजूला व जगावर प्रेम करावे, जीवनात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, मी कालच्यापेक्षा आज चांगला माणूस आहे का? याचा शोधा घ्यावा, विविध क्षमता व कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने त्या-त्या क्षेत्रातील गुरू शोधावा हाच खरा जगण्यातील आनंद आहे, असे प्रतीपादन ज्येष्ठ विचारवंत संजय जोशी यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): जीवन जगताना स्वतःवर, आजूबाजूला व जगावर प्रेम करावे, जीवनात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, मी कालच्यापेक्षा आज चांगला माणूस आहे का? याचा शोधा घ्यावा, विविध क्षमता व कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने त्या-त्या क्षेत्रातील गुरू शोधावा हाच खरा जगण्यातील आनंद आहे, असे प्रतीपादन ज्येष्ठ विचारवंत संजय जोशी यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सोमवारी आयोजित केलेल्या 'सोनाई व्याख्यानमालेत' श्री. जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ होत्या. ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या मातोश्री श्रीमती सोनाई नरके यांच्या 12 व्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, प्रा. हरी नरके व आरती भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार अॅड. अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश भुजबळ, विद्या भुजबळ, संभाजी भुजबळ, सोमनाथ कुदळे, पोपट भुजबळ, चेतना ढमढेरे, रेश्मा गायकवाड, उपसरपंच गणेश भुजबळ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजसुधारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रा. हरी नरके यांनी मान्यवरांना पुस्तके भेट दिली.

श्री. जोशी यांनी जीवन जगण्यासाठी श्रेयस, ईश्वर, गुरू, वाचन, शुभाशिते, तंत्रज्ञान व आत्मसंवाद या मंत्राचा वापर करून आनंदी जीवन कसे जगावे याची विविध उदाहरणे देवून प्रेक्षकांना जगण्याचा अर्थ समजावून सांगितला. आनंदी जगण्यासाठी वाचन महत्वाचे असून, वाचनातून लेखकांना चांगली दाद द्यावी, वाचाल तर समृद्ध व्हाल, वाचनातून राजहंस व्हावे, नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करून काम हाच छंद बनवावा, श्रेयस व प्रेयस यातून जगण्यात समाधान मिळते, बुद्धी व शरीराचा वापर भौतीक सुख उपभोगण्यासाठी करावा, वैध व नैतिकतेने मिळविलेली संपत्ती सुंदर असते, स्वतःशी संवाद साधून मनाला सुखी करा व आनंदी जीवन जगा, असे विविध आनंदी जीवन जगण्याचे पैलू श्री. जोशी यांनी प्रेक्षकांना सांगितले.

दीड तासाच्या व्याख्यानात श्री जोशी यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून जगणे आनंदाचे या व्याख्यानमालेचा समारोप केला. समता परीषदेचे पदाधिकारी सोमनाथ भुजबळ, रामदास भुजबळ, विष्णू नरके, लक्ष्मण नरके आदींनी व्याख्यानमालेचे संयोजन केले. अनिल नरके यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ भुजबळ यांनी आभार मानले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news talegaon dhamdhere sanjay joshi speech