मिळकतकर वसुलीसाठी लोकअदालत 

मिळकतकर वसुलीसाठी लोकअदालत 

पुणे - महापालिकेच्या उत्पन्नाचा आलेख कमी होत असल्याने महत्त्वाच्या खात्याकडील थकबाकी वसूल करण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी, याकरिता लोकअदालत भरविण्यात येणार असून तित मिळकतधारकांना थकबाकीवरील दंडाच्या रकमेत 15 ते 20 टक्के सवलत दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर नव्या वर्षात म्हणजेच, जानेवारीत लोकअदालत होईल. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास तीनशे कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. 

शहरात सुमारे सव्वाआठ लाख निवासी आणि व्यावसायिक मिळकती आहेत. मात्र, त्यातील काही मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. तरीही तो भरण्यासाठी मिळकतधारक पुढे येत नाही. विशेषत: मिळकतींची दुबार नोंदणी आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे कराच्या थकबाकीचा आकडा वाढत गेला आहे. अशा मिळकतधारकांकडे सुमारे 1800 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महापालिकेच्या नोंदणीवरून आढळून आले आहे. 

थकीत कर वसूल करण्याच्या उद्देशाने गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या वतीने दोन वेळा अभय योजना राबविण्यात आली आहे. थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सवलत दिल्याने योजनेला प्रतिसाद मिळाला; परंतु, थकबाकीचा आकडा म्हणावा तितका कमी झाला नाही. त्यातच, महापालिकेच्या उत्पन्नात यंदा 1700 कोटी रुपयांची तूट येणार असल्याचे आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम, विकासकामांवर होण्याची भीती आहे. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. 

थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी लोकअदालत भरविण्याचे नियोजन केले आहे. लोकअदालतीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधितांना 20 टक्‍क्‍यांपर्यंत असेल, असे सांगण्यात आले. 

महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांकडील थकबाकी वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन विकासकामे करता येतील. मिळकतकर विभागाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. लोकअदालतीच्या माध्यमातून बहुतांशी प्रकरणे निकाली निघतील. याबाबतचा प्रस्ताव आल्यास मंजूर केला जाईल. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाच्या योजनांना सहकार्य करण्यात येईल. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष स्थायी समिती. 

सर्वाधिक पाणीपट्‌टी वसूल 
पाणीपुरवठा खात्याकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महापालिका न्यायालयातर्फे भरविण्यात आलेल्या लोकअदालतीत सुमारे 59 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. त्यात, सर्वाधिक थकीत पाणीपट्‌टी वसूल झाली असून, लोकअदालतीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या थकबाकीच्या रकमेत दहा टक्के सवलत देण्यात आली. पाणीपट्‌टी थकविलेल्या सुमारे 397 जणांना नोटिसा देण्यात आली होती. त्यापैकी 138 जण सहभागी झाले होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमाला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक, महापालिका न्यायालयाच्या न्यायाधीश अनुराधा पांडुळे, विधी अधिकारी मंजूषा इधाटे, विधी सल्लागार रवींद्र थोरात उपस्थित होते. 

स्थायी समितीच्या सूचनेनुसार लोकअदालत घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, त्या संदर्भातील प्रस्ताव आठवडाभरात स्थायी समितीसमोर ठेवण्यात येईल. 
- विलास कानडे, प्रमुख, मिळकतकर विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com