शिक्षक देता का शिक्षक?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

महापालिकेच्या वि. स. खांडेकर इंग्रजी माध्यम शाळेतील स्थिती
सहकारनगर - मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असून, पालकांचा इग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. मात्र इग्रजी शाळांमध्ये पटसंख्या वाढ असली, तरी या शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असल्याचे चित्र पुणे महापालिकांच्या शाळेत दिसत आहे. 

सहकारनगर येथील वि. स. खांडेकर या महापालिकेच्या इंग्रजी शाळेत तळजाई वसाहत, अरण्येश्वर, मोगल वस्ती येथील  मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षकांचा व स्वच्छतेचा अभाव दिसला. शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी शाळेतील दुरवस्था व शिक्षक नसल्याची तक्रार ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे केली. खांडेकर शाळेत इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा भरत आहेत. इग्रजी माध्यममध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात एकूण २८३ विद्यार्थी आहेत, तर ज्युनिअर व सीनियर के.जी. च्या वर्गात १८९ मुले-मुली आहेत. एकूण ४७२ पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ दोन प्राथमिक शिक्षक, तीन बालवाडी शिक्षिका व दोन शिपाई आहेत. यावर कहर म्हणजे शाळेला मुख्याध्यापकच नाही.

या बाबत अखिल भारतीय बहुजन सेनेने शिक्षण मंडळाला निवेदन दिले असून, मनपाच्या शाळेत शिक्षक भरती करून शाळेचा दर्जा सुधारावा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अध्यक्ष नीलेश वाघमारे, सुरेश खंडाळे, संतोष माने, अनिल शेलार, प्रकाश माने, महादेव देडे, पप्पू वाघमारे यांनी दिला आहे. 

नगरसेविका कदम म्हणाल्या, ‘‘शाळेचा दर्जा सुधारावा यासाठी प्रभागातील विकास निधीची तरतूद केली आहे. शाळेत शिक्षक भरती करावी, यासाठी वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासन याकडे गंभीरपणे पाहत नाही.’’