नाट्यगृहांचा ‘पडदा’ पडलेलाच

नाट्यगृहांचा ‘पडदा’ पडलेलाच

पुणे - कुठे रंगमंच अपुरा आहे, तर कुठे नाटकाचे प्रयोगच होत नाहीत... कुठे प्रसिद्धीअभावी उद्‌घाटनानंतरच्या दोन वर्षांत एकही नाट्यप्रयोग झालेला नाही, तर कुठे खुर्च्याच तुटल्या आहेत... पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांवरील ताण कमी करण्यासाठी आणि उपनगरांमधील नागरिकांची सोय होण्यासाठी वेगवेगळ्या भागांत नाट्यगृहांची उभारणी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अजूनही त्यांचा पुरेसा वापर होत नाही आणि तेथे वेगवेगळ्या समस्याही असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले.

‘नाट्यगृह उभारले, जबाबदारी संपली’, अशा वृत्तीने लोकप्रतिनिधींनी नाट्यगृहे उभारली आहेत का? असा सवाल नाट्य वर्तुळातून उपस्थित होत आहे. नाट्यगृहाचे नाव पुढे करून सभागृह बांधून घ्यायचे आणि नंतर त्याचा वापर राजकीय आणि अन्य कार्यक्रमांसाठी करायचा, अशी ही क्‍लृप्ती आहे का, अशी शंकाही काही रंगकर्मींना येत आहे. परिणामी नव्याने उभारलेल्या बहुतांश नाट्यगृहांचा वेगवेगळ्या कारणांमुळे उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे नाट्यगृहांचा ‘पुतळा’ झाल्याचे आढळून येत आहे.

नाट्यगृह बांधण्याआधी निरनिराळ्या कलाकारांची मते पालिकेने विचारात घ्यायला हवीत. त्यामुळे पुढे गैरसोयी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी कलाकारांची एक समिती नेमली जावी. ती नाट्यगृहांची देखभालसुद्धा सुचवू शकते. कारण अनेक ठिकाणी स्वच्छतेबरोबरच प्रकाशयोजना, ध्वनियोजनेचा अभाव दिसतो.
- माधव वझे, नाट्य समीक्षक

नाटकांच्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील सर्व नाट्यगृहांत आम्ही जातो. नाट्यगृह उभारताना किंवा त्याचे उद्‌घाटन करताना पालिकेतर्फे जो उत्साह दाखवला जातो, तो उत्साह नाट्यगृहाची देखभाल करताना जाणवत नाही. त्यामुळेच अनेक नव्या नाट्यगृहांत समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे पालिकेने लक्ष द्यायला हवे.
- मोहन कुलकर्णी, नाट्य व्यवस्थापक

उद्‌घाटनानंतरही काम सुरूच
येरवडा - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे उद्‌घाटन झाले. महापालिकेने अद्याप खुले केले नसल्याने ते अजूनही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेतच आहे. खाली पार्किंग आणि पहिल्या मजल्यावर रंगमंच असेल तर तिथवर नाटकांचा सेट घेऊन जाणे अवघड असते. त्यामुळे या नाट्यगृहाचा उपयोग अद्याप झाला नाही. 

येथे नाटकाचा सेट पहिल्या मजल्यावर घेऊन जाता यावा म्हणून लिफ्ट बांधली जात आहे. 

याचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसत आहे. व्हीआयपी कक्षाचेही काम रखडलेल्या स्थितीत आहे. 

फारसे नाट्यप्रयोग नाहीत
वानवडी - महात्मा जोतिराव फुले नाट्यगृह उत्तम स्थितीत आहे, मात्र तेथे फारसे नाट्यप्रयोग होत नाहीत. शिवाय, नाट्यगृहाच्या आवारात उभारलेले सभागृह अद्याप खुले करण्यात आलेले नाही.

सांस्कृतिक भवनात ‘अतिक्रमण’
घोले रस्ता - नाटकांचे प्रयोग फारसे चालत नसल्याने कमी क्षमतेचे नाट्यगृह पुण्यात उभारले जावे, अशी मागणी कलाक्षेत्रातून सातत्याने झाली. या पार्श्‍वभूमीवर घोले रस्त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे छोट्या आकाराचे नाट्यगृह उभारण्यात आले. या नाट्यगृहाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे; पण हे सांस्कृतिक भवन असल्याने येथे नाट्यगृहाबरोबरच साने गुरुजी ग्रंथालय, पुण्याचा इतिहास उलगडणारे कायमस्वरूपी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने या वास्तू बंद आहेत. शिवाय, सांस्कृतिक उद्देशासाठी उभारलेल्या या वास्तूत पालिकेची वेगवेगळी कार्यालयेही टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहेत. या ‘अतिक्रमणा’बद्दल कला क्षेत्रातून नाराजी व्यक्त  होत आहे.

आणखी तीन नाट्यगृहांची भर
‘‘वेगवेगळ्या भागांत पालिकेची नाट्यगृह उभारण्यात आली आहेत. त्यात तीन नाट्यगृहांची भर पडणार आहे. हडपसर येथे नाट्यगृह उभारले जात असून, त्यासाठी आत्तापर्यंत २० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या वर्षी आणखी ४ कोटी खर्च होतील. हे नाट्यगृह पूर्ण व्हायला आणखी दीड वर्षाचा कालावधी लागेल. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारी आणखी एक बालनाट्यगृह उभारले जात आहे. हे नाट्यगृह ४०० आसनक्षमतेचे असून याचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सिंहगड रस्त्यावर कलामंदिर उभारले जाणार आहे. या कामाची सुरवात नुकतीच झाली आहे. कलामंदिर उभारण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च होतील. हे कलामंदिर अडीच वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता संदीप खांडवे यांनी ‘सकाळ’ला दिली.

सुशोभीकरणाचे निघताहेत ‘पापुद्रे’
पद्मावती - बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, सहकारनगर या भागातील प्रेक्षकांना आपल्याच भागात नाटक पाहता यावे म्हणून महापालिकेने ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक’ उभे केले. नाट्यगृहाची उभारणी उत्तम झाली असल्याने येथे नाटकांचे नियमित प्रयोग होतात, पण नाट्यगृहाच्या वरच्या मजल्यावर उभारण्यात आलेले भव्य कलादालन धूळ खात पडून आहे. तेथे केलेल्या सुशोभीकरणाचे ‘पापुद्रे’ निघत आहेत. इतकेच नव्हे, तर स्वच्छतागृहातील पाण्याचे नळही गायब झाले आहेत, आरसे फुटलेल्या स्थितीत आहेत, त्यामुळे स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तरीसुद्धा येथे प्रेक्षकांची वर्दळ आहे. मात्र, वर्दळीचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांतील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत.

शाहू नाट्यगृहच ‘गायब’?
हडपसरमध्ये ‘राजर्षी शाहू महाराज संकुल व नाट्यगृह’ उभारण्यात येणार होते; पण या नाट्यगृहाचे नाव बदलून ते ‘विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह’ असे केले आहे. त्यामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे.
राजर्षी शाहू महाराज संकुल व नाट्यगृहाच्या कोनशिलेचे अनावरण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २००९ मध्ये झाले होते. त्या वेळी कोनशिलेवर शाहू महाराजांचे नाव होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहावर ‘विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह’ असा फलक लावला आहे. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या, ‘‘नाट्यगृहाला शाहू महाराज यांचेच नाव द्यायचे, हा निर्णय झाला होता; पण अर्धवट काम झालेले असताना हे नवे नाव देण्याची इतकी घाई का? विठ्ठल तुपे पाटील यांची दखल वेगळ्या पद्धतीने घेता आली असती.’’ चेतन तुपे म्हणाले, ‘‘शाहू महाराजांचे नाव संकुलाला देण्याचा निर्णय झाला होता. नाट्यगृहाला नव्हे.’’

वर्षात एकही नाट्यप्रयोग नाही
सहकारनगर - नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृती जतन करता याव्यात म्हणून महापालिकेने सहकारनगर भागात उभारलेल्या नाट्यगृहाला तेंडुलकर यांचे नाव दिले. लालन सारंग, सतीश आळेकर या रंगकर्मींच्या हस्ते नाट्यगृहाचे उद्‌घाटनही झाले. पण त्यानंतर हे नाट्यगृह शैक्षणिक कार्यक्रमासाठी वापरले जाईल, असे महापालिकेने जाहीर केले. त्यामुळे येथे एकही नाटक होऊ शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर, अशा नाट्यगृहाला तेंडुलकरांचे नाव नको, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी पालिकेकडे वारंवार केली. तीसुद्धा मान्य केली जात नाही. नाट्यगृहातील काही खुर्च्या गायब असून आवारात राडारोडा आहे.

नाट्यगृहाची माहितीच नाही
भवानी पेठ - सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे दर्शन घडविता यावे म्हणून भवानी पेठेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले. याचे उद्‌घाटन २०१४ मध्ये झाले. तेव्हापासून हे स्मारक बंद आहे. नाट्यगृह उत्तम असले तरी तेथे नाटकाचा एकही प्रयोग झाला नाही. ‘स्मारकाच्या आत नाट्यगृह आहे, ही माहितीच आमच्यापर्यंत पोचवली नाही’, असे नाट्य व्यवस्थापक सांगत आहेत. नाट्यगृहात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे दररोज टॅंकरने पाणी मागवले जात आहे. वातानुकूलन यंत्रणा बंद आहे. स्मारकाच्या आवारातील योगसाधना केंद्र, ग्रंथालय, कलादालनही कुलूप बंद अवस्थेतच आहेत.

रंगमंच ठरतोय अपुरा
औंध - नाट्यगृह ऐसपैस आणि रंगमंच छोटा, अशी स्थिती औंधच्या पं. भीमसेन जोशी कलामंदिरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे नाटकाचा प्रयोग करणे म्हणजे तारेवरची कसरतच बनली आहे. नाटक झाले तर प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे; पण मोठा सेट असलेली आणि हाउसफुल चालणारी  नाटके येथे घेऊन जाणे अशक्‍य आहे. रंगमंचाचा आकार कमी आहे. शिवाय, तो मागच्या बाजूला निमुळता होत गेला आहे. रंगमंच्याच्या मागे आणि अवतीभोवतीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे रंगमंचाचा आकार वाढवा, अशी मागणी नाट्य व्यवस्थापकांकडून होत आहे. 
सध्या लहान सेट असलेली मोजकीच नाटके येथे सादर होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com