वर्षभरात सहा हजार चोऱ्या; एक हजार घरफोड्या

वर्षभरात सहा हजार चोऱ्या; एक हजार घरफोड्या

पुणे - शहरात सध्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल सहा हजार चोऱ्या आणि एक हजारांहून अधिक घरफोड्या झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. दरम्यान, चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी केवळ ३९ टक्‍के, तर घरफोड्यांमधील २५ टक्‍केच मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहरात सन २०१७ मध्ये पूर्वीच्या तुलनेत चोरी आणि घरफोड्यांमध्ये घट झाली आहे; मात्र नाकाबंदी, पोलिस गस्त वाढवून आणि शहरातील बराचसा भाग हा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असूनही चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २६ ठिकाणी दरोड्याच्या घटना घडल्या. जबरी चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असून, दिवसा आणि रात्रीच्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमधून चिंता व्यक्‍त केली जात आहे. घराला कुलूप लावून दिवसा कामावर जाणाऱ्या नागरिकांना परत येईपर्यंत घरातील ऐवज सुरक्षित राहील, याची खात्री वाटत नाही. चोरटे घरात कोणी नसल्याची रेकी करून दिवसाढवळ्या घरफोड्या करत आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाहनचोरीच्या गुन्ह्यांत वाढ
सन २०१७ मध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात तीन हजार १६९ वाहने चोरीस गेली. त्यापैकी केवळ ९६३ गुन्हे उघडकीस आले. हे प्रमाण केवळ ३० टक्‍के इतके आहे. सन २०१६ मध्ये वाहनचोरीच्या तीन हजार ७३ घटना घडल्या. त्यापैकी ९९५ वाहने शोधण्यात यश आले.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी 
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चांगले सुरक्षारक्षक नेमावेत
सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी झाली आहे का, हे तपासावे 
बंगल्याच्या परिसरात, सोसायटी किंवा अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची गरज
भंगार विक्रेते, फेरीवाले आणि बाहेरील व्यक्‍तींना प्रवेश देण्यापूर्वी माहिती घ्यावी
घराची रेकी करणाऱ्या संशयितांवर नजर ठेवावी
बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या

साडेचौदा कोटींवर डल्ला
गेल्या वर्षभरात चोरट्यांनी शहरात एक हजार घरफोड्या करून तब्बल १४ कोटी ५६ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. पोलिसांना त्यापैकी केवळ तीन कोटी ६४ लाख रुपयांचा (२५ टक्‍के) ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे. त्यात रात्रीच्या घरफोड्यांमध्ये दहा कोटी ६५ लाख रुपये, तर भरदिवसा घरफोड्या करून तीन कोटी ९१ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.

पोलिसांकडून उपाययोजना
स्थानिक पोलिसांच्या पथकाकडून दिवसा आणि रात्री गस्त वाढविण्याची गरज
नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन
पोलिस रेकॉर्डवरील चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई अपेक्षित
सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून चोरट्यांवर कारवाई व्हावी

चोरी, घरफोडीच्या घटना आणि उघडकीस आणण्याचे प्रमाण (सन २०१७)
गुन्हा                     दाखल        उघड         प्रमाण टक्‍क्‍यांत

जबरी चोरी               ३९७      ३३८       ८५ टक्‍के
सोनसाखळी चोरी    ९७           ८३          ८६ टक्‍के
इतर जबरी चोरी       ३००         २५९        ८६ टक्‍के
दिवसा घरफोडी        २८६           १८४        ६५ टक्‍के
रात्री घरफोडी          ७१८         ३५२         ४९ टक्‍के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com