चोर ‘सायबर’; पोलिस हतबल!

चोर ‘सायबर’; पोलिस हतबल!

चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत चोरटे घराचा दरवाजा उचकटून मौल्यवान वस्तू चोरतात, पण आता सायबर तंत्रज्ञान आत्मसात केलेले गुन्हेगार बनावट डेबिट कार्ड तयार करून आणि ऑनलाइन बॅंकिंगद्वारे लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करत आहेत. सायबर गुन्ह्यांची ही व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयाकडून अधिक सक्षम पावले उचलण्याची गरज आहे.

पुण्यातील एका नामांकित खासगी कंपनीतील एक अतिवरिष्ठ अधिकारी दुपारच्या वेळेत घरी वामकुक्षी घेत होते. त्या वेळी त्यांच्या मोबाईलवर डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढल्याचा एसएमएस आला. काही सेकंदांनी पुन्हा पैसे काढल्याचा एसएमएस. पुन्हा असे चार- पाच मेसेज मोबाईलवर येऊन धडकले... आणि त्या अधिकाऱ्याची झोपच उडाली. नेमके काय घडतेय, हे लक्षात येईपर्यंत त्यांच्या बॅंक खात्यातून ८० हजार रुपये चोरीस गेले होते.

डेबिट कार्ड खिशातच असूनही पैसे कोण आणि कसे काढतोय, असा प्रश्‍न त्या अधिकाऱ्याला पडला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्या वेळी त्यांच्या डेबिट कार्डचे क्‍लोनिंग म्हणजे हुबेहूब बनावट डेबिट कार्ड तयार करून अज्ञात व्यक्‍तीने पैसे काढल्याचे त्यांना समजले. अशाच प्रकारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड क्‍लोनिंग करून पुणे, मुंबई, बंगळूर आणि तमिळनाडूसह विविध शहरांतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीला पुणे सायबर पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहरातील हॉटेल्स, मॉल्स, पेट्रोल पंप आणि एटीएम मशिनमध्ये ‘स्किमर’ बसवून हा दरोडा घालण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. पोलिसांनी या गुन्ह्यात मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी विविध बड्या शहरांमध्ये ठिकठिकाणी ‘स्किमर’ बसवून त्याद्वारे कार्डवरील डाटा चोरून बनावट कार्ड तयार केले होते. या टोळीत एटीएम मशिनवरून पैसे काढून देणे आणि नागरिकांच्या बॅंक खात्यांची माहिती देण्यासाठी काहींची कमिशनवर नेमणूक केल्याचे समोर आले. अशा प्रकारच्या काही टोळ्या पुण्यासह इतर शहरांत बसून काम करीत आहेत.

नागरिकांची एटीएम आणि ऑनलाइन बॅंकिंगद्वारे आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आगामी काळात सायबर गुन्हेगारीचे हे प्रमाण वाढतच जाणार आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ही बाब समाधानकारक आहे. मात्र, सध्या सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता सायबर पोलिसांकडे पुरेशी तंत्रज्ञान सामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. त्यासाठी सायबर पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासासाठी पुरेसा निधी आणि सायबर तंत्रज्ञान प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

खबरदारी घ्याल तरच...
सायबर गुन्हेगारी रोखणे हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड हाताळताना अथवा ऑनलाइन बॅंकिंग करताना खबरदारी न घेतल्यास त्यांचे आर्थिक नुकसान होते. या संदर्भात सायबर पोलिसांकडून शहरातील विविध महाविद्यालये, आयटीसह खासगी कंपन्यांत जाऊन प्रबोधन केले जात आहे. तरीही आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना सुरूच आहेत. शाळा- महाविद्यालये, तसेच खासगी व सरकारी संस्थांनी त्यांच्याकडील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सायबर गुन्हेगारीबाबत प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com