बांधकामाचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे/धायरी - इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील बांधकामाचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पुणे/धायरी - इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील बांधकामाचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

प्रकाश विडासाव गुप्ता (वय 30, रा. हजारीबाग, झारखंड), दुलारीचंद्र रामेश्‍वर राम (वय 37, रा. चंदनगुड्डू, जि. हजारीबाग, झारखंड) आणि मिथुन भरत सिंग (वय 20, रा. डुमका, जि. गोड्डा, झारखंड) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, रामेश्‍वर रूपलाल दास (वय 24, रा. मनैय्या, जि. हजारीबाग, झारखंड) असे जखमींचे नाव आहे. 

तर, पाटे डेव्हलपर्ससह साइट इंजिनिअर, सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी साइट सुपरवायझर अंगद व्यंकटराव पांचाळ आणि साइट कॉन्ट्रॅक्‍टर शंभुराजे उद्धव काटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पु. ल. देशपांडे उद्यानासमोर पाटे डेव्हलपर्सच्या निवासी बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम सुरू होते. त्याठिकाणी 14 कामगार काम करीत होते. दिवाळीच्या सणानिमित्त काही कामगार लवकर काम संपवून घरी गेले. तर, चौघेजण तेथे सेंट्रिंगचे काम करीत असताना एकाचा लाकडी फळ्यांवरून पाय निसटला. त्याचा तोल गेल्यामुळे चौघेही खाली कोसळले. त्यापैकी तिघांचा खाली पडून गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. तर, रामेश्‍वर दास हा तिसऱ्या मजल्यावर अडकून पडल्यामुळे तो बचावला. तो किरकोळ जखमी झाला असून, त्याला जबर मानसिक धक्‍का बसला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत असून, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार गीता दळवी यांनी दिली. 

नशीब बलवत्तर म्हणून... 
दहाव्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम सुरू असताना, चौघेजण खाली कोसळले. त्यापैकी रामेश्‍वर दास हा तिसऱ्या मजल्यावर अडकल्यामुळे बचावला. मात्र, तो तिसऱ्या मजल्यावर कसा आला, हे दास यालाही सांगता येत नव्हते. 

"स्टॉप वर्क'ची नोटीस 
अपघात झालेल्या बांधकामाला काम थांबविण्याची "स्टॉप वर्क' नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. संबंधित इमारतीला 12 मजल्यांच्या बांधकामाची परवानगी देण्यात आली होती. हा अपघात मानवी चुकीमुळे का, निष्काळजीपणामुळे झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत. महापालिकेची त्यांना काही मदत हवी असल्यास ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या काही भागात जाळी बसविण्यात आली आहे. मात्र, ज्याठिकाणी कामगार खाली पडले त्याठिकाणी जाळी नव्हती. तसेच, कामगारांना सेफ्टी बेल्टही पुरविण्यात आले नव्हते, अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अनिल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दत्तवाडी. 

या प्रकल्पाचे बांधकाम व्यावसायिक, अभियंता, साईट सुपरवायजर आणि सेंट्रिंगच्या ठेकेदारासह संबंधितांवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. महापालिकेच्या संबंधित अभियंता आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली. 
- माधुरी मिसाळ, आमदार 

दिवाळीनिमित्त साईटवर आठवडाभर काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, सेंट्रिंगच्या ठेकेदाराने आम्हाला माहिती न देता परस्पर काम सुरू ठेवले. ठेकेदाराने दिवाळीला गावी जाण्यापूर्वी कामगारांना थोडेसे काम संपवून जाण्यास सांगितले होते. त्यामुळे ते काम आटोपून घरी जाण्याच्या तयारीत होते. एका कामगाराचा तोल गेल्यामुळे धक्‍का लागून ही दुर्घटना घडली. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जाळीही बसविण्यात आली होती. परंतु, चौघेही एकदाच पडल्यामुळे भार सहन न झाल्याने जाळीसह खाली पडले. 
- प्रमोद वाणी, संचालक, पाटे डेव्हलपर्स.