दुकानांसमोरील वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - बाजीराव रस्त्यावर पुरम चौक आणि शनिपार चौक वगळता वाहतूक पोलिसांचे अस्तित्व दिसून येत नाही. पोलिसांचे थोडे दुर्लक्ष झाले की, बेशिस्त वाहनचालक दोन्ही बाजूंना दुकानांसमोर वाहने उभी करतात. या रस्त्यावर नो-पार्किंगबाबत आणि सूचना देणारे पुरेसे फलक नाहीत. तसेच या रस्त्याला जोडण्यात आलेले एकआड एक उपरस्ते एकेरी असूनही दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांना आणखी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

या रस्त्यावर सोमवारी (ता. ३) पाहणी केली असता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांसमोर वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले. बॅंकेत रोकड भरण्यासाठी आलेली वाहने बराच वेळ रस्त्यावर उभी असतात. चारचाकी वाहनांसाठी पार्किंगचा फलक लावण्यात आलेला आहे. वाहनांची वर्दळ असताना दुकानांसमोर माल चढविणे-उतरविण्याचे काम सुरूच आहे. वाहतुकीबाबत सूचना देणारे काही फलक जागेवर नाहीत, तर काही ठिकाणी नुसतेच खांब आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

बाजीराव रस्त्यावर पी१-पी२ ची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी महापालिकेच्या मदतीने पट्टे आखण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या एकेरी उपरस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात येईल. तसेच नव्याने आणखी उपाययोजना करण्याबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त (वाहतूक) 

बाजीराव रस्त्यावर किमान एवढे करा...
वाहनांच्या पार्किंगसाठी पी१-पी२ ची अंमलबजावणी करावी
वाहतूक सूचनांबाबत जुने फलक काढून ठळक ठिकाणी नवीन फलक लावावेत
यापूर्वी निश्‍चित केलेल्या उपरस्त्यांवर एकेरी वाहतुकीचे पालन व्हावे
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाईची गरज
वाहतूक निरीक्षकपद रिक्‍तच!
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या प्रमुख पेठा, तसेच बाजीराव रस्ता, भाजी मंडई, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात वाहनांची वर्दळ असते. या भागात वाहतूक नियमनासाठी पुरेसे पोलिस नाहीत; मात्र विशिष्ट चौकातच जादा संख्येने पोलिस असतात. तसेच विश्रामबाग आणि खडक वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांचे पद रिक्‍तच आहे. सध्या तेथील कारभार सहायक निरीक्षकांकडून चालविला जात आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिस निरीक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे.