'एकेरी'मुळे वाहतुकीचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पहिल्याच दिवशी कर्वे, पौड रस्त्यावर वाहनांच्या रांगा

पहिल्याच दिवशी कर्वे, पौड रस्त्यावर वाहनांच्या रांगा
पुणे/कोथरूड - नळ स्टॉप चौकातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यास सुरवात केली. मात्र, या प्रयोगाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी वाहतुकीचा बोजवारा उडाला. कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. एसएनडीटी जंक्‍शन, कॅनॉल रस्ता आणि प्रभात रस्त्यावरील लोकूर चौकात झालेल्या कोंडीमुळे वाहनचालकांनी या बदलांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

शहर वाहतूक पोलिसांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून कर्वे रस्त्यावरील चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगास सुरवात केली. कर्वे रस्त्यावरील करिष्मा चौक आणि पौड रस्त्यावरील जोग हॉस्पिटलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दररोज डेक्कनच्या दिशेने जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. त्यामुळे काही वाहनचालकांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता; परंतु सकाळी दहा वाजता सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारी एक वाजल्यानंतरही कायम होती. त्यामुळे वैतागलेल्या स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरून एसएनडीटी महाविद्यालयासमोरील चौकात गर्दी केली. नागरिकांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, "योजनेचा हा पहिला दिवस आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी संयम पाळून सहकार्य करावे', असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.

अट्टाहास कोणासाठी?
कर्वे रस्त्यावरील वाहतूक अरुंद गल्लीत वळविण्यात आली आहे. नळ स्टॉप ते एसएनडीटी चौकापर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण रिकामी होती. तर, अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हा अट्टाहास नेमका कोणासाठी, असा सवाल काही वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला.

वाहतुकीत बदल केल्यामुळे झालेला परिणाम
ठळक निरीक्षणे -

- एसएनडीटी चौकात वाहतूक संथ गतीने
- एसएनडीटी चौक ते दशभुजा गणपती चौकापर्यंत वाहनांच्या लांब रांगा
- अरुंद कॅनॉल रस्त्यावर "नो पार्किंग'मध्ये वाहने
- काही ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम
- लोकूर चौकात बसचालकांना वळण घेताना अडचणी
- लॉ कॉलेज रस्त्यावरून आलेल्या वाहनचालकांना नळ स्टॉप चौकातून उजवीकडे वळताना संभ्रम
- या भागातील शाळा सुरू झाल्यावर कोंडीत भर पडणार

बारा वर्षांपूर्वी असा बदल करण्यात आला होता. मात्र, तो प्रयोग अयशस्वी ठरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी विरोध करीत बंद पाडला होता. तरीदेखील पुन्हा तोच प्रयोग का राबविला जात आहे, याचे उत्तर पोलिस प्रशासन देत नाही. तातडीने हा प्रयोग न थांबविल्यास नागरिक आंदोलन करतील.
- अशोक जोशी, स्थानिक रहिवासी

लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नळस्टॉप चौकातील समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी फसलेले प्रयोग पुन्हा राबविण्यात कोणताही शहाणपणा नाही. असे प्रयोग तत्काळ बंद करून वाहतूक पूर्ववत करावी.
- अनिरुद्ध खांडेकर

या बदलामुळे गुलमोहर सोसायटीसह काही सोसायट्यांतील रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. हा बदल तात्पुरता असला तरी नागरिकांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांना विनाकारण मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
- स्थानिक रहिवासी

या रस्त्यावरून नित्याने ये-जा करावी लागते. या योजनेमुळे वाहतूक कोंडीत भरच पडली आहे. या संदर्भात स्थानिक आमदारांना निवेदन दिले आहे. हा प्रयोग बंद झाला पाहिजे.
- मिलिंद कुलकर्णी, रहिवासी, शास्त्रीनगर

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. या बदलामुळे नळस्टॉप चौकासह लॉ कॉलेजसह रस्त्यावरील सुरळीत झाली आहे. चक्राकार वाहतुकीमुळे चौक सिग्नलविरहित होऊन वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे. मात्र, प्रायोगिक तत्त्वावरील हा बदल यशस्वी ठरला तरच अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- प्रतिभा जोशी, पोलिस निरीक्षक, कोथरूड वाहतूक विभाग

आंदोलनाचा इशारा
ही योजना यापूर्वीही अयशस्वी ठरली होती. नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. हा फसलेला नाट्यप्रयोग तातडीने बंद करावा; अन्यथा सर्वपक्षीय समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी दहा वाजता एसएनडीटी चौकात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित अग्रवाल आणि कॉंग्रेसचे संदीप मोकाटे यांनी दिला आहे.

कोथरूड - चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगामुळे पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी कर्वे रस्त्यावर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा.