वृक्षारोपण उदंड; पण कागदोपत्री

मीनाक्षी गुरव
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - शहरातील वृक्षसंपदा वाढविण्यासाठी मोठा गाजावाजा करत वन विभागाने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. त्यावर ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. लाखो झाडे लावण्यात आल्याचा दावाही करण्यात आला; परंतु  कागदोपत्रीच वृक्षारोपण जास्त झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या सहा वर्षांतील ६१.७९ टक्के झाडे जिवंत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. ‘सकाळ’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाडे जिवंत असल्याचे दिसून आले.

पुणे - शहरातील वृक्षसंपदा वाढविण्यासाठी मोठा गाजावाजा करत वन विभागाने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. त्यावर ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. लाखो झाडे लावण्यात आल्याचा दावाही करण्यात आला; परंतु  कागदोपत्रीच वृक्षारोपण जास्त झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या सहा वर्षांतील ६१.७९ टक्के झाडे जिवंत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. ‘सकाळ’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाडे जिवंत असल्याचे दिसून आले.

वन विभागाने गेल्या सहा वर्षांत राबविलेल्या वनीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी ‘सकाळ’ने ‘माहिती अधिकारा’अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार भांबुर्डा, कोथरूड, लोणी काळभोर, कात्रज, धानोरी, खडकवासाला, धायरी आदी परिसरात वनीकरण गेल्या सहा वर्षांत विविध योजनांतर्गत एकूण पाच हजार ६८ हेक्‍टर क्षेत्रावर वनीकरण करण्यात आले. त्यात ४३ लाख ८३ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यातील ६१.७९ टक्के रोपे जिवंत असून, वनीकरणासाठी आतापर्यंत सुमारे ११.६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत, असा दावा वन विभागाने केला आहे. त्यातील तथ्यता पडताळण्यासाठी वनीकरण झालेल्या शहरातील काही वनक्षेत्राची ‘सकाळ’ने पाहणी केली. त्यात वृक्षारोपण झालेल्या ठिकाणांचा आढावा घेतल्यावर काही ठिकाणी वनक्षेत्र भकास असल्याचे दिसून आले; तर काही ठिकाणी येथे वृक्षरोपण झाले होते का, याबाबत प्रश्‍न पडतो. 

पाण्याची तरतूदच नाही
पुणे वन विभागात दौंड, इंदापूर, बारामती हा भाग संपूर्णपणे अर्वषणप्रवण क्षेत्रात मोडतो. वन विभागात केलेली रोपवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असून, जिवंत रोपांचे प्रमाण पूर्णपणे पावसाळ्यात मिळणारे पाणी, जमिनीतील ओलावा यावर अवलंबून आहे. वन विभागातील अंदाजपत्रकामध्ये रोपांना पाणी देण्याची तरतूद केलेली नसते. केवळ रोपवनाच्या संरक्षणासाठी तरतूद केलेली असते, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. 

वृक्षारोपण ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वृक्षारोपणासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते; परंतु झाडांना पाणी घालणे, त्याची देखभाल करणे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्याशिवाय झाडांच्या संवर्धनासाठी लोकांनी पुढाकार घ्यावी, अशी अपेक्षा आहे. वृक्षारोपण अयशस्वी ठरले, असे म्हणता येत नाही. कारण लावलेल्या वृक्षांपैकी ४० टक्के वृक्ष जगली तरीही ही चळवळ यशस्वी झाल्याचे म्हटले जाते.
- रंगनाथ नाईकडे, उपवनसरंक्षक (प्रादेशिक)

हिंगणे 
हिंगणे परिसरातील नागरी वन उद्यान प्रकल्पांतर्गत वृक्षारोपणाच्या उपक्रमांचे उद्‌घाटन पावसाळ्याच्या सुरवातीला झाले. दिमाखदार कार्यक्रम घेऊन येथे वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. हिंगणे टेकडीवर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यात दुतर्फा चार ते सहा फुटांची झाडे लावण्यात आली; परंतु अवघ्या काही महिन्यांतच येथील उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्याच्या आजूबाजूला झाडे लावण्यासाठी खणलेल्या खड्ड्यांची आता कचराकुंडी झाली आहे. 

भांबुर्डा
गोखलेनगर येथील वन भवनाच्या जवळपास असणाऱ्या भांबुर्डा वनक्षेत्रातही गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपण केले जात आहे. या वर्षीही येथे मोठ्या प्रमाणात चार ते पाच फूट उंचीची झाडे लावण्यात आली. शहरात राहूनही जंगलाचा अनुभव देणारा हा परिसर असला, तरीही येथील वृक्षांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येते. वृक्षारोपणांतर्गत लावलेल्या झाडांची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास येते.
धायरी
धायरेश्‍वर मंदिरामागील डोंगरावर काही वर्षांपूर्वी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. धायरी परिसरात २०१५-१६ मध्ये जवळपास ३६ हजार ७०० झाडे लावण्यात आली. त्यातील २३ हजार १२१ झाडे म्हणजेच ६३ टक्के झाडे जिवंत असल्याचा दावा वन विभागाने दिलेल्या माहितीत केला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील ४० टक्‍क्‍यांहून कमी झाडे जिवंत असल्याचे पाहायला मिळते.

वृक्ष लागवडीचा खर्च आणि जिवंत रोपांची टक्केवारी
वर्ष    लागवडीचा खर्च (लाखांमध्ये)    लावलेली रोपे    जिवंत रोपे    जिवंत रोपांची टक्केवारी

२०१६-१७    १५५.२०    ५,११,५००    ४,२४, ६९८    ८३.०३
२०१५-१६    ३०९.२०    ८,३०,९९५    ६,०५,६२९    ७२.८८
२०१४-१५    २८८.००    ८,५०,८७५    ५,८९,५६१    ६९.२९
२०१३-१४    ३२.५५    ५,८९,४४४    ३,४८,८३३    ५९.१८
२०१२-१३    २९३.७४    १२,७०,८८४    ५,९७,९५१    ४७.०५
२०११- १२    ९०.१७    ३,३०,२९३    १,४२,३८९    ४३.११

Web Title: pune news tree plantation on paper