मुंढे यांच्या उपस्थितीवरून गदारोळ

मुंढे यांच्या उपस्थितीवरून गदारोळ

पुणे - पीएमपीमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे उत्पन्नातील तब्बल ५५ टक्के वाटा वेतनासह मनुष्यबळावर खर्च होत आहे. तसेच, चुकीच्या पद्धतीनेही बढत्या झाल्यामुळे अनेकजणांना तिप्पट-चौपट वेतन मिळत आहे. मात्र, कर्मचारी कमी न करता त्यांची उपयुक्तता कशी वाढेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसपेक्षा पीएमपीच्या बस अधिक कशा धावतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. पीएमपी प्रवासी केंद्रित करायची असेल तर, सर्वांच्या सहकार्याची आवश्‍यकता आहे, अशा शब्दात पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सभागृहाला खडे बोल सुनावले.

परंतु, सर्वसाधारण सभेदरम्यान मुंढे पूर्णवेळ उपस्थित न राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांचा निषेध करीत गदारोळ केला. 
आगामी आर्थिक वर्षात दैनंदिन संचलनातील तुटीचे सुमारे १४४ कोटी रुपये पीएमपीला देण्यासाठी महापालिकेत खास सर्वसाधारण सभा प्रभारी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. या सभेला मुंडे यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली होती. त्यानुसार सकाळी अकरा ते दुपारी दीड दरम्यान मुंढे उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, शीतल तेली- उगले आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सभेचा वृत्तांत संचालक मंडळापुढे मांडण्याची सूचना प्रभारी महापौरांनी केली. तसेच मुंढे सभेतून अचानक निघून गेल्याबद्दल त्यांचा निषेध धेंडे यांनी केला. त्याचे अनेक सदस्यांनी स्वागत केले. 

सभेचे कामकाज सुरू झाल्यावर मुंढे यांनी सुमारे ४५ मिनिटे निवेदन केले. त्यात पीएमपीची नेमकी अडचण काय आहे, तोटा का वाढत आहे, तो कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, सुधारणांचा प्रवास कसा सुरू आहे, बस खरेदीची प्रक्रिया कोठवर आली आदी विविध मुद्यांचा त्यात समावेश होता. त्यानंतर आबा बागूल, प्रशांत जगताप, गोपाळ चिंतल, धीरज घाटे, महेंद्र पठारे यांची भाषणे झाले. पल्लवी जावळे यांचे भाषण सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास मुंढे निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी हरकत घेतली. ‘मुंढे यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते’, असे म्हणत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही सदस्यांनीही त्यांना साथ दिली. त्यानंतर सुमारे पाऊणतास सभागृहाचे कामकाज विस्कळित झाले होते. मुंढे यांना परत बोलवा, अशी मागणी केली.

तेव्हा ‘मुंढे यांना त्यांच्या कार्यालयात काही बैठका आहेत. त्यामुळे ते गेले आहेत’, असे स्पष्टीकरण प्रभारी महापौरांनी केले. परंतु, त्याने सदस्यांचे समाधान झाले नाही. या गोंधळातच विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच दत्तात्रेय धनकवडे, प्रशांत जगताप, दीपक मानकर, विशाल तांबे आदींनी ‘मुंढे सभागृहाचा अपमान करून निघून गेल्यामुळे त्यांच्यावर कंपनी कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी सभा तहकूब करावी,’ अशी उपसूचना मांडली. आबा बागूल यांनी यांवर सूचक म्हणून स्वाक्षरी केल्यामुळे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्याशी त्यांची चकमक उडाली. त्यानंतर सभेचे कामकाज तहकूब न करता चर्चा करावी, असे आवाहन सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि अरविंद शिंदे यांनी केले. त्यानंतर चर्चेला पुन्हा सुरवात झाली.

‘खास सभेत येऊन तुम्ही तुमची भूमिका मांडा आणि त्यानंतर गेलात तरी चालेल’ असे पदाधिकाऱ्यांनी मला बोलविताना सांगितले होते. त्यानुसार सभेत भूमिका मांडल्यावरही मी सुमारे दीड तास थांबलो होतो. एकूण अडीच तास सभेत उपस्थित होतो. त्यानंतर महत्त्वाची कामे असल्यामुळे प्रभारी महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना कल्पना देऊन गेलो. त्यामुळे सभेतून मी अचानक निघून गेलो, असे म्हणता येणार नाही.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष, पीएमपी

बढत्यांमध्ये मनमानी
तुकाराम मुंढे म्हणाले, ‘‘पीएमपीची २९ मार्च २०१७ रोजी सूत्रे हाती घेतल्यापासून प्रवासीकेंद्रित सुविधा पुरविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पीएमपीची प्रगती होत असून, तोटा कमी करण्यासाठीही अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एका बसमागे सहा कर्मचाऱ्यांचे प्रमाण असावे, असा राष्ट्रीय निकष आहे. परंतु, सध्या पीएमपीत एका बसमागे नऊ कर्मचारी आहेत. येथे एका लिपिकाला सहा वर्षांत तीनवेळा बढती मिळून चौपट पगार होतो, हे कोणत्या नियमाच्या आधारे? बढत्यांमध्ये मनमानी होत होती. त्यामुळे तोटा वाढणारच ना! ’’

पासचा खप वाढला; ब्रेकडाउन कमी
कंपनी स्थापन होऊन दहा वर्षे झाली तरी भरती आणि बढत्यांबाबत नियमावली तयार झाली नव्हती. आता ती तयार होत आहे. अनावश्‍यक जादा मनुष्यबळ, ठेकेदारांच्या बस चालविण्यास देण्यात आलेले प्राधान्य यामुळेच तोटा वाढला आहे. एरवी पीएमपीच्या ५० टक्के आणि कंत्राटदारांच्या ५० टक्के बस धावत होत्या. आता पीएमपीच्या बस ८० टक्‍क्‍यांपर्यंत मार्गावर वाढल्या आहेत. ब्रेकडाउनचे प्रमाणही प्रतिदिन ३५० वरून ९० पर्यंत कमी झाले आहे. पीएमपीच्या बस मार्गांवर जादा संख्येने कशा धावतील, यावरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे संस्थेचा फायदा होणार आहे. पास दरवाढ झालेली नाही, तर अनुदानाचे प्रमाण ५० टक्के केले आहे. पासचा खप उलट वाढला आहे, असे तुकाराम मुंढे यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. देखभाल-दुरुस्तीसाठी शेड्यूल्ड तयार केले आहे, तर मार्गांचे सुसूत्रीकरण करून शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांना सेवा दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com