तुळस उत्पादकांच्या आयुष्यात सुगंध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे - कफ, वात, ताप (ज्वर) त्वचा व श्‍वसन विकारांवर गुणकारी तुळस उपयुक्त ठरतेच. धार्मिक कार्यक्रमांत तुळशीला असलेले प्रमुख स्थान आणि औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून होणारी मागणी तसेच वर्षाला लाखोंच्या संख्येत विकली जाणारी रोपे लक्षात घेता समाधानकारक रोजगार देणाऱ्या तुळशीची लागवड करण्याकडे शासकीय नर्सरीसह सोमाटणे फाटा, औंध, मांजरी, हडपसर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर येथील खासगी उत्पादक विशेष पसंती दर्शवू लागले आहेत. 

आयुर्वेदात तुळस या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या काढ्यातही तुळस हमखास असतेच. कृष्ण तुळस, राम तुळस, बालाजी तुळस या तुळशीच्या तीन जाती आहेत; परंतु अधिक मात्रेने औषधी गुणधर्म असलेल्या कृष्ण तुळशीची लागवड सर्वाधिक होते. पूर्वी घरोघरी तुळशी वृंदावन होती. मात्र, बदलत्या जीवनशैलीत (फ्लॅट सिस्टिम) घराच्या दारात, वऱ्हांड्यात किंवा गच्चीवर तुळशीचे रोप पाहायला मिळेलच असे नाही; पण बहुतांश नागरिकांच्या दारात तुळस असतेच असते. 
दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचे सामूहिक कार्यक्रमही आता सामाजिक संस्था, हौशी समूह घेऊ लागले आहेत. तुळशीची रोपे समारंभात भेट म्हणून दिली जात आहेत. त्यामुळे या रोपांना बारमाही मागणी वाढू लागली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शासकीय नर्सरीत कार्यरत असलेले कर्मचारी बंडू ववळे म्हणाले, ‘‘आधुनिक जीवनशैलीतही तुळशीचे महत्त्व जपले जात आहे. सामाजिक संस्था एकाच वेळी शंभर ते पाचशेच्या पटीत रोपे खरेदी करतात. महिन्याला पाचशे ते दीड हजारांच्या संख्येत रोपांची विक्री होते. तुळशी विवाहालादेखील नागरिक आवर्जून रोपे खरेदी करतातच. त्यामुळे तीन आठवडे आधीच तुळशीचे उत्पादन घ्यायला सुरवात करतो.’’ 
विक्रेते कमलेश विनोदे म्हणाले, ‘‘सोमाटणे फाटा येथे तुळशीची रोपे विकणारे घाऊक विक्रेते आहेत. दहा हजारांहून अधिक रोपांचीही विक्री तेथे होते. कारखान्यांच्या मागणीनुसारही तुळशीच्या रोपांचे उत्पादन घेण्यात येते.’’

तुळस अनेक आजारांवर उपयुक्त आहे. तुळशीच्या सराद्वारे औषधे तयार करतात. गुणधर्माच्या दृष्टीने कृष्ण तुळस अधिक उपयुक्त असते. अन्य वनस्पती रात्री कार्बनडाय ऑक्‍साईड सोडतात. तुळस मात्र ऑक्‍सिजन सोडते. बंगले, सोसायट्यांच्या आवारात तुळस लावल्यास परिसर स्वच्छ राहील. कीटक, डासांपासूनही तुळशीमुळे संरक्षण होते. तुळशीच्या सुगंधामुळे वातावरण शुद्ध होते.
- डॉ. कल्याणी भट, उपअधीक्षक, सेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय