चोवीस तास पाण्यासाठी 1 ऑगस्टपासून कामास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे जलवाहिन्यांच्या कामाची कुदळ महिनाभरात मारली जाणार असून, त्यात जलवाहिन्यांपाठोपाठ मीटर बसविण्याची कामेही हाती घेतली जाणार आहेत. या संदर्भातील कामांसाठी राबविण्यात येणारी निविदा प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण करून येत्या 1 ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामे सुरू होतील, असे महापालिका प्रशासनाने सोमवारी सांगितले. या कामांसाठी एकत्रित निविदा काढली जाणार आहे. 

पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून, तिच्या माध्यमातून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्यात विविध भागात 83 पाण्याच्या टाक्‍या उभारण्याची कामे सुरू आहेत. तसेच सुमारे 1 हजार 600 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील या कामांसाठी आवश्‍यक असलेला निधी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात आला असून, त्यानुसार सुमारे दोनशे कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे जलवाहिन्या आणि मीटर बसविण्याची कामे सुरू केली जाणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासन करत आहेत. ही प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करून लगेचच जलवाहिन्यांच्या कामांसाठी खोदाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. शिवाय, या काळात मीटर खरेदी करून व्यावसायिक नळजोड असलेल्या ठिकाणी ते बसविण्यात येतील, असेही सांगण्यात आले. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ""या योजनेत आता जलवाहिन्या आणि मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ती पुढील महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामे सुरू होणार आहेत. त्याची पूर्वतयारी करण्यात येत आहे.'' 

पावसाचा अंदाज घेऊनच कामे 
जलवाहिन्यांच्या कामांमुळे शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात येणार आहे. पावसामुळे या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या काळात खोदाई केल्यास वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज घेऊनच कामे करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.