उरुळी देवाची, फुरसुंगीला महापालिकेत सामावून घेणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या तीन महिन्यांत त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या तीन महिन्यांत त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात जमा होणाऱ्या सुमारे १ हजार ६०० टन कचऱ्यापैकी रोज जवळपास सातशे ते आठशे टन कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील डेपोत टाकण्यात येतो. मात्र तेथील ग्रामस्थांचा कचरा टाकण्यास विरोध होत आहे. दरम्यान, डेपोला आग लागल्यानंतर झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनावर कार्यवाही होत नसल्याचा आक्षेप घेत, ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

डेपोची क्षमता संपल्याने कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांच्या काही मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही काही मागण्यासंदर्भात ग्रामस्थ ठाम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये, यासाठी ही दोन्ही गावे महापालिकेत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, ही गावे महापालिकेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.