कचरा ठरू शकतो उपयुक्त

संतोष शाळिग्राम
बुधवार, 12 जुलै 2017

पुणे विद्यापीठात उभा राहणार ‘प्लाझ्मा टॉर्च’ प्रकल्प

पुणे - डोकेदुखी ठरणारी कचऱ्याची समस्या हे संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभे राहिले आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय संशोधकांना त्यात यश आले आहे. देशांतर्गत संशोधन करून विकसित केलेला प्लाझ्मा टॉर्च प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभा राहणार आहे. 

प्लाझ्मा टॉर्च या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे कचरा वर्गीकृत न करताच यात वापरता येतो. हा प्रकल्प पूर्णत: बंदिस्त असल्याने पर्यावरणाला कोणतीच हानी पोचत नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळण्याची पद्धत आहे. अशा स्थितीत नायट्रोजन ऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्‍साईड, कार्बन डायऑक्‍साईड, डायऑक्‍सिन हे विषारी वायू हवेत मिसळतात. त्यावरचा उपाय म्हणजे प्लाझ्मा टॉर्च आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वीज कचऱ्याला जाळतानाच तयार होणार आहे. यातून उरलेल्या पदार्थाचा वापर रस्ते बांधणीच्या कामातही करता येतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या सोडविण्यात हा प्रकल्प मोठी भूमिका बजावू शकेल. 

कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी झालेल्या संशोधनाबाबत विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. सुधा भारोस्कर म्हणाल्या, ‘‘पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या या पॉलिइथिलिन टेरिफ्थॅलेटच्या असतात. त्यातून पेट्रोल काढण्याचे तंत्र विकसित झाले आहे. हे पेट्रोल इंधन म्हणून वापरता येते.’’

कचरा डेपोला अनेकदा आग लागण्याचे प्रकार घडतात. कारण, कचऱ्यामध्ये विशेषत: ओल्या कचऱ्यामध्ये मिथेन वायू असतो. त्यामुळे कचरा पेट घेतो. आता या कचऱ्यापासून घरगुती वापराचा गॅस तयार होतो. काही स्वयंसेवी संस्था कचरा घेऊन सिलिंडरमध्ये गॅसही भरून देण्याचा उपक्रम राबवीत असतात. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे तंत्रज्ञान सर्वश्रुत आहेच. कचरा ही समस्या असली, तरी तंत्रज्ञानाचा वापर केला तर हीच समस्या लोकांसाठी उपयोगी ठरू शकते.
- डॉ. सुधा भारोस्कर, प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ