फ्यूजन, संगीतनाट्य अन्‌ सतारवादन

फ्यूजन, संगीतनाट्य अन्‌ सतारवादन

पुणे - तरुण रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारे शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, वैभवशाली प्राचीन संगीत नाटकांच्या परंपरेचे दर्शन घडविणारा ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग, प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन आणि तरुणाईचा आवडता सतारवादक नीलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन ऐकण्याची संधी देणारा यंदाचा ‘वसंतोत्सव’ येत्या शुक्रवारपासून (ता.१९) न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या मैदानात रंगणार आहे.

तीनही दिवसांचे कार्यक्रम सायंकाळी ५.४५ वाजता सुरू होणार असून, प्रवेशिका घेऊन येणाऱ्या रसिकांना सायंकाळी ५ वाजल्यापासून महोत्सवस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. 

ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त ‘सकाळ’ प्रस्तुत करत असलेल्या या स्वरयात्रेसाठी ‘मराठे ज्वेलर्स’ टायटल स्पॉन्सर आहेत. पॉवर्ड बाय ‘रावेतकर ग्रुप’ या उत्सवासाठी ‘हॅशटॅग’ आणि ‘महामेट्रो’ सहप्रायोजक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. बॅंकिंग पार्टनर, ९१.१ एफएम रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, महेफिल केटरिंग सर्व्हिसेस, जनसेवा भोजनालय फूड पार्टनर, गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, १०० टक्के पब्लिक रिलेशन्स पीआर पार्टनर, सेतू ॲडव्हर्टायझिंग कम्युनिकेशन पार्टनर आणि व्हाइट कॉपर प्रा. लि. एक्‍झिक्‍युटिंग पार्टनर आहेत.

वसंतोत्सव २०१८
पहिला दिवस : कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी, राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन
दुसरा दिवस : ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग
तिसरा दिवस : लुई बॅंक्‍स-निर्वाणा या बॅंडचे फ्यूजन, नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन. सोबत तबलावादक विजय घाटे.

डॉ. पटवर्धन, बक्षी, घोरपडे यांचा सन्मान
संगीतक्षेत्रात विद्यादान करणारे गुरुजन, संशोधन- लेखन करणारे कलावंत आणि उदयोन्मुख कलाकार यांना ‘वसंतोत्सव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गानगुरू डॉ. सुधा पटवर्धन, बंदिशकार- गायक पं. विजय बक्षी, युवा गायक ईश्‍वर घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. ‘वसंतोत्सवा’च्या शेवटच्या दिवशी, रविवारी (ता. २१) या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

जाणून घ्या पंजाब घराण्याची तबलावादन शैली
तबलावादनासाठी पंजाब घराण्याचा नावलौकिक फार आहे. पंजाब घराण्याच्या या शैलीबाबत सांगताहेत प्रसिद्ध तबलावादक योगेश समसी.

फाळणीनंतर आपल्याकडच्या अनेक दिग्गज तबलावादकांना देश सोडून जावं लागलं. त्यांची कला व रसिक परस्परांना दुरावले. मी गेल्या  दहा वर्षांपासून चंडीगडच्या पंडित सुशीलकुमार जैन यांच्याकडून त्या संदर्भातील बरंच काही जाणून घेत आहे. संशोधना आधारे  पंजाब घराण्याचा बाज तबला कलावंतांमध्ये व रसिकांमध्ये पुन्हा रुजविण्यासाठी प्रयत्न करतो आहे. वसंतोत्सवानिमित्त ‘वसंतोत्सव विमर्ष’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तबलावादन शिकणारे व रसिक यांच्याशी मी या घराण्याचा वैशिष्ट्यांबद्दल संवाद साधणार आहे. प्रत्यक्ष वादन करून सोदाहरण विवेचन करणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. १८) टिळक रस्त्यावरील जोत्स्ना भोळे सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल. त्यानंतर तीन ते पाच या वेळेत मी कार्यशाळाही घेणार आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात इतर घराण्याच्या तबलावादक विद्यार्थ्यांनीही यावं.

संगीत हे मनोरंजनापेक्षाही आत्मरंजनाचं माध्यम असल्याचं पूर्वसूरींनी सांगितलेलं आहे. रसिकांनीही आस्वाद घेण्याचा दर्जा वाढवत राहण्याची साधना सतत करत राहिलं पाहिजे. उत्तम जाण असलेल्या रसिकांसमोर वाजविण्याचं आव्हान पेलण्यासाठी कलावंतांनाही अभ्यास वाढवावा लागतो. विमर्शसारख्या आयोजनामुळे ही संधी मिळते.

आपल्याकडचे खूप वरच्या दर्जाचे कित्येक तबलावादक कलावंत फाळणीमुळे पाकिस्तानात गेले आणि ज्ञानाचा एक मोठा स्रोत खुंटला. त्या काळात दस्तऐवजी करून ठेवण्यासाठी आजच्यासारख्या अद्ययावत सुविधाही नव्हत्या. शिवाय जुन्या काळच्या समजुतीनुसार उस्ताद व पंडित आपली विद्या सर्वांपुढं आणत नसत. त्यामुळेही पंजाब घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाची माहिती हरवत गेली. मी जैनसाहेबांकडून विस्तृत प्रमाणात जमवलेल्या माहितीचं भांडार आता खुलं करत असतो. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे या  महोत्सवाच्या निमित्तानं रसिकांसाठी मनोरंजनापलीकडे जाऊन शिक्षणाची संधी ‘वसंत विमर्श’च्या माध्यमातून निर्माण करून दिली जाते,  ही बाब आपल्या सांस्कृतिक उत्कर्षासाठी अतिशय मोलाची आहे.
शब्दांकन - नीला शर्मा

‘समर्पित अभ्यासातून तरुणाईने वेगळेपण शोधावे’
नीलाद्रीकुमार हे मुळात सतारवादक असले तरी, झितारमुळे (इलेक्रॉनिक सितार) ते चर्चेत आले. आजच्या शास्त्रीय संगीताबाबत त्यांचं मनोगत.

मी  वसंतोत्सवात सतार वाजवणार आहे. झितार वाजवीन की नाही ते आयत्या वेळी ठरवीन. वसंतोत्सवात शास्त्रीय संगीतातील विशुद्धता व परंपरा यांचं  संतुलन साधलं जातं. त्यामुळे तरुण कलावंत व रसिकांना दोन्ही अनुभवण्याची संधी मिळते. सतारवादनात पूर्वीच्या पिढीतील दिग्गजांनी प्रचंड काम करून ठेवले आहे. त्या आधारेच आम्ही पुढची वाटचाल करीत आहोत. नवा प्रयोग करण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज असते.
सध्या मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार ठराविक राग गायले, वाजवले जातात. आपल्या अभिजात संगीतात निरनिराळ्या वेळांना अनुरूप राग वाजवण्याची परंपरा आहे. मात्र सकाळी, दुपारी, मध्यरात्री तसंच उत्तररात्री कार्यक्रमांअभावी त्या वेळच्या रागसंगीताचा आनंद मिळत नाही. वेगवान काळानुसार ऑनलाइन संगीत शिक्षणाचे तंत्र वाईट नाही, पण त्याला मर्यादा जरूर आहेत. समोरासमोर बसून शिकण्याची गुरू-शिष्य परंपरा व नवे तंत्रज्ञान यांच्यातून सुवर्णमध्य ठरेल, असं काही विकसित व्हायला हवे. तरुणांना एखाद्या कलावंताची भुरळ पडल्यामुळे ते संगीताकडे येऊ पाहतात. याऐवजी समर्पित वृत्तीने अभ्यास करून ते स्वतःतले वेगळेपण शोधावे आणि वाढवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com