भाजी खरेदीसाठीही ऑनलाइनला पसंती

सुवर्णा चव्हाण
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - स्वच्छ, ताजे आणि निवडलेल्या भाज्या घरपोच मिळाल्या तर..! हे खरंय. विविध संकेतस्थळ, ॲप आणि दूरध्वनीद्वारे आता घरपोच ताजी भाजी मिळत आहे. बाजारात जाऊन भाजी विकत घेण्यासाठी वेळ नसल्याने भाजी घरपोच मिळावी, यासाठी अनेक जण ऑनलाइन संकेतस्थळांचा आधार घेत आहेत.

पुणे - स्वच्छ, ताजे आणि निवडलेल्या भाज्या घरपोच मिळाल्या तर..! हे खरंय. विविध संकेतस्थळ, ॲप आणि दूरध्वनीद्वारे आता घरपोच ताजी भाजी मिळत आहे. बाजारात जाऊन भाजी विकत घेण्यासाठी वेळ नसल्याने भाजी घरपोच मिळावी, यासाठी अनेक जण ऑनलाइन संकेतस्थळांचा आधार घेत आहेत.

अशाप्रकारे पालेभाज्या आणि कडधान्ये ऑर्डर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 
ऑनलाइन भाज्या मागविणाऱ्यांचे प्रमाण खासकरून सहकारनगर, कोथरूड, सिंहगड रस्ता आणि औंध भागात अधिक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेल आणि खानावळींकडूनही आता थेट ऑनलाइन भाज्या ऑर्डर केल्या जात आहेत. यात छोट्या व्यावसायिकांचीही भर पडली आहे. व्यावसायिक नीरज पारखी म्हणाले, ‘‘पुण्यात ऑनलाइन भाज्या मागविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हॉटेल आणि खानवळींकडूनही ऑनलाइन भाज्या मागविल्या जात आहेत. भाज्यांचे खास पॅकेज तयार केले आहेत. कुटुंबांकडून एक पाव ते दीड किलो भाज्यांची मागणी होते. त्यात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मागविल्या जातात.

भाज्यांसाठी पॅकेजेसनुसार दर आकारले जाते. भाज्या स्वच्छ आणि त्यांचे पॅकेजिंग करण्यासाठी बचत गटातील महिलांना काम दिले आहे. भाज्यांसह फळही मागविले जातात.’’

एक तासात होम डिलिव्हरी
सकाळी-सकाळी ताजी भाजी मिळावी, यावर गृहिणींचा भर असतो. ऑनलाइन भाजी मागविणाऱ्यांना आता अर्धा ते एका तासात घरपोच भाजी मिळत आहे. स्वच्छता, पॅकेजिंग, गुणवत्ता आणि वेगळेपण यावर खास भर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चिरलेल्या भाज्याही मिळत आहेत. 

थेट शेतकऱ्यांकडून भाजी
लोकांची गरज ओळखून आता भाजी थेट शेतकऱ्यांकडून आपल्या घरी पोचत आहे. त्यासाठी कंपन्या आणि मॉल्सनी शेतकऱ्यांशी करार केला आहे. त्याचबरोबर घरगुती व्यवसाय करणारेही शेतकऱ्यांकडून भाज्या मागवीत आहेत.

ई-पेमेंटचे प्रमाण वाढले
भाज्या मागविल्यानंतर कॅश पेमेंट करण्यापेक्षा लोक ई-पेमेंटवर भर देत आहेत. त्यासाठी संकेतस्थळ, ॲप्लिकेशनवर ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. आपण ऑनलाइन सर्च केल्यानंतर भाज्या डिलिव्हरी करणारी अनेक संकेतस्थळ दिसतात.

महिन्याच्या बिलात समावेश
ऑनलाइन भाज्या मागविण्याचा ट्रेंड तर रूढ झाला असून, त्याचा समावेश आता महिन्याच्या बिलामध्येही होत आहे. पेपर आणि किराणा मालाच्या बिलाप्रमाणे ऑनलाइन भाज्या मागविण्याचेही बिल गृहिणी तयार करत आहेत.

फेसबुक, व्हॉट्‌सॲपद्वारे प्रसिद्धी
घरपोच भाजी पोचविण्याचा व्यवसाय अनेकांनी घरगुती स्वरूपात सुरू केला आहे. त्याची खास प्रसिद्धी फेसबुक आणि व्हॉट्‌सॲपद्वारे करण्यात येत आहे. विशेषतः हा घरगुती व्यवसाय करणाऱ्यांनी आपली संकेतस्थळेही सुरू केली आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या ताज्या भाजीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

भाज्यांचे पॅकेजेस
भाज्या थेट घरी मिळाव्यात याकडे लोकांचा कल वाढल्यामुळे विविध कंपन्या, मॉल्स आणि व्यावसायिकांनी भाज्यांचे महिन्यांचे आणि पंधरा दिवसांचे पॅकजेस्‌ तयार केले आहेत. त्यात कडधान्ये, पालेभाज्या आणि फळभाज्यांचा मागणीप्रमाणे समावेश करण्यात येतो. कुटुंबासाठी लागणारी पंधरा दिवसांची आणि महिन्याभराची भाजी टप्प्याटप्प्यानुसार घरी पोचविली जाते. आपण पॅकेज निवडायचा आणि लागेल त्याप्रमाणे भाजीसाठी दूरध्वनी करायचा. या पॅकेजप्रमाणे भाजी थेट तुमच्या दारी पोचविण्यात येते.

बाजारात जाऊन भाजी घेणे शक्‍य होत नसल्याने मी फोन करून घरीच भाजी ऑर्डर करते. त्यांचे ठरलेले महिन्याचे पॅकेजेस असतात. ते विकत घेतले की, महिन्याच्या भाजीचा प्रश्‍न मिटतो. ताजी, स्वच्छ आणि निवडलेल्या भाज्या घरपोच मिळतात यातच आपला फायदा होतो.
- प्रज्ञा गायकवाड, गृहिणी